Mumbai Crime : चिमुरडीची हत्या करून मृतदेह लपवला सुटकेसमध्ये; शेजाऱ्याच्या भयंकर कृत्याने पोलिसही चक्रावले

मुंबई : मुंबईच्या तळोजा परिसरातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. येथून खेळता खेळता बेपत्ता झालेली ३ वर्षीय चिमुरडीची हत्या करण्यात आली आहे. हर्षिका शर्मा असं चिमुरडीचा नाव आहे. तिच्या शेजारी राहणाऱ्या मोहम्मद अन्सारीनेच हत्या करून तिच्याच घरात तिचा मृतदेह सुटकेसमध्ये दडवून ठेवला. या घटनेची माहिती मिळताच अवघ्या १२ तासांत पोलिसांनी मोहम्मद अन्सारीच्या मुसक्या आवळल्या आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
मंगळवारी २५ मार्च रोजी हर्षिका खेळण्यासाठी बाहेर गेली आणि परत घरी आलीच नाही. वडिलांनी तळोजा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनीही हर्षिकाचा शोध घेण्यासाठी पाच पथके रवाना केली होती. मात्र हर्षिका सापडली नाही. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास हर्षिकाच्या घरात अत्यंत सडका वास येऊ लागला. हा वास कशाचा याचा शोध घेण्यास सुरुवात केली असता घरातील बाथरूममधील पोटमाळ्यावर ठेवलेल्या सूटकेसमध्ये हार्षिकाचा मृतदेह आढळला. मृतदेह पाहताच हर्षिकाच्या आई-वडिलांच्या पायाखालची वाळू सरकली. या घटनेची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली.
शेजाऱ्यानेच केली हर्षिकाची हत्या
तळोजा पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. हर्षिका राहत असलेल्या इमारतीमधील रहिवासी, शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता मोहम्मद अन्सारीसोबत हर्षिकाच्या कुटुंबाचा काही वाद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मोहम्मद अन्सारीच्या कुटुंबाची चौकशी करताच हर्षिकाची हत्या मोहम्मद अन्सारीनेच केल्याचे उघड झाले.
दोन्ही कुटुंबातील वादातून केली हत्या
मोहम्मद अन्सारी याची बायको आणि मयत हर्षिका हिच्या आईसोबत वारंवार भांडणे होत होती. ही भांडणे केवळ दोन्ही कुटुंबातील मुलांमध्ये होत असलेल्या वादावादीतून होत असल्याने याच कारणावरून मोहम्मद अन्सारीने हर्षिकाची हत्या केली. मोहम्मद अन्सारीने हर्षिकाची हत्या स्वतःच्या घरात केली. मात्र, मृतदेहाची विल्हेवाट त्याला लावता येईना. शेवटी शर्मा कुटुंब हर्षिकाला शोधण्यासाठी बाहेर पडल्याची संधी साधत अन्सारीने हर्षिकाचा मृतदेह तिच्या घरात ठेवला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.





