Rohit Arya। मुंबईच्या पवई परिसरात रोहित आर्य या व्यक्तीने १९ जणांना ओलीस ठेवल्याचा ठार काल दुपारी घडला. रोहित आर्य याने 17 मुलांना सरकारी जाहिरातीसाठी ऑडिशनच्या नावाखाली पवईच्या आर.ए. स्टुडिओमध्ये बोलावले होते. साधारण ५ ते ६ दिवस ऑडिशन झाल्यानंतर काल त्याचा शेवटचा दिवस होता. याच शेवटच्या दिवशी रोहितने आपला डाव साधला आणि या मुलांना ओलीस ठेवले होते. मात्र अथक प्रयत्नानंतर मुंबई पोलिसांनी रोहित आर्यचा एन्काऊंटर केला. या सगळ्या घटनेनंतर रोहित आर्यविषयी महत्वाची माहिती समोर आली. रोहित आर्य हा एका सरकारी योजनेमुळे उध्वस्त झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. रोहित आर्य याने वर्षभरापूर्वी शिंदे सरकारच्या काळात एका सरकारी योजनेचे काम केले होते. मात्र, या योजनेचे तब्बल 2 कोटी रुपये सरकारने थकवले होते. याविरोधात रोहित आर्य याने उपोषणही केले होते. मात्र, त्याला सरकारी यंत्रणने दाद न मिळाल्यामुळे रोहित आर्य प्रचंड नैराश्यात होता. याच नैराश्याच्या भरात रोहित आर्य याने 17 जणांना ओलीस ठेवले होते. योजनेसाठी घर आणि दागिने विकले ? Rohit Arya। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना‘ राबवण्यात आली होती. याच योजनेतंर्गत रोहित आर्य यांनी ‘स्वच्छता मॉनिटर’ हा उपक्रम राबवला होता. त्यासाठी रोहित आर्य यांनी स्वत:चे घर आणि दागिने विकले होते. पण ‘स्वच्छता मॉनिटर’ उपक्रम पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारने त्यांना कुठलेच पैसे दिले नाहीत. त्यामुळे रोहित आर्य यांनी दीपक केसरकर यांच्याविरोधात दोनवेळा उपोषणही केले होते. मात्र, त्यांच्याकडूनही केवळ आश्वासन मिळाल्याने रोहित आर्य प्रचंड नैराश्यात असल्याचे सुरज लोखंडे यांनी सांगितले. रोहित आर्य यांना एक मुलगा आहे. त्यांची पत्नी आयसीआयसीआय बँकेत मोठ्या हुद्द्यावर कामाला आहे. सरकारी योजना नेमकी काय होती ? Rohit Arya। देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर शिंदे सरकारच्या अनेक योजनांना कात्री लावली होती. काही दिवसांपूर्वीच शिंदे सरकारच्या काळात सुरु झालेली ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना’ बंद होणार असल्याची चर्चा रंगली होती. यापूर्वी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पान हे उपक्रमही बंद करण्यात आले होते. राज्यातील शाळांचा सर्वांगीण विकास करणे, त्यांचे आधुनिकीकरण आणि सौंदर्यीकरण करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा ही योजना 5 डिसेंबर 2023 रोजी सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 2023 शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळांमध्ये स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. राज्य, जिल्हा आणि तालुकास्तरावर स्पर्धा घेण्यात आल्या. लाखो रुपयांची पारितोषिके देण्यात आली. त्यामुळे राज्यातील शिक्षण संस्थांसह विद्यार्थी आणि पालकांमध्येही या योजनेची चर्चा होती. मात्र, आता निधीच्या कमतरतेमुळे या योजनेचा गाशा गुंडाळण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.याच योजनेत रोहित आर्य याचे सरकारने पैसे थकवले असल्याचा आरोप त्याने केला आणि कालचा प्रसंग घडला असल्याचे म्हटले जात आहे.