Liquor Seized : पुरंदरमध्ये मोठी कारवाई! सिंगापूर हद्दीत दारूचा कंटेनर पकडला; १.२७ कोटींचा मुद्देमाल जप्त
Liquor Seized : गोवा राज्यातील निर्मित आणि महाराष्ट्रात बंदी असलेल्या विदेशी मद्याची पुरंदर तालुक्यातून होणारी मोठी तस्करी सासवड पथकाने पकडली.

Liquor Seized – राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पथकाने सिंगापूर गावच्या (ता. पुरंदर) हद्दीत मोठी कारवाई करत गोवा राज्यातील निर्मित आणि महाराष्ट्रात विक्रीस प्रतिबंधित असलेला १ कोटी २७ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला. या कारवाईत एक आरोपी अटकेत असून कंटेनरसह मोठ्या प्रमाणात विदेशी मद्य जप्त करण्यात आले आहे.
गोवा राज्य निर्मित मद्याची महाराष्ट्रात अवैधरीत्या मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याची माहिती विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार सासवड विभागाच्या पथकाने विशेष मोहीम राबवून बेलसर-वाघापूर मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली. तपासणीदरम्यान सिंगापूर गावच्या हद्दीत एका हॉटेलसमोर संशयित कंटेनर (क्र. एन.एल. ०१ एन. ७६२३) थांबविण्यात आला. चालकाकडे चौकशी केली असता त्याने संशयास्पद उत्तरे दिल्याने वाहनाची सखोल तपासणी करण्यात आली.
तपासणीमध्ये वाहनातून गोवा राज्य निर्मित १८० मिली क्षमतेच्या तब्बल ६१ हजार ९२० सीलबंद बाटल्या (१,२९० बॉक्स) आढळून आले. या मद्यसाठ्याची किंमत १ कोटी ११ लाख ४५ हजार ६०० रुपये इतकी असून, वाहतुकीसाठी वापरलेला कंटेनर, दोन मोबाईल आणि इतर साहित्य असा एकूण १ कोटी २७ लाख ५४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी कैलाशकुमार नानजी पटेल यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक एस. एस. बरगे, निरीक्षक झेंडे, पी. एम. मोहिते, दुय्यम निरीक्षक पी. जे. मेहता, गिरीश कर्चे, सागर साबळे, मनोज होलम, सागर दुबळे यांच्या पथकाने केली. पुढील तपास निरीक्षक बरगे करीत आहेत.





