Illegal abortion racket : केडगावातील अवैध गर्भपात रॅकेटवर पोलिसांचा घाव; डॉक्टर स्वाती लवंगारे यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल
दौंड तालुक्यात अवैध गर्भपाताच्या घटनांची (Illegal abortion racket) मालिका उघड होत असताना आता केडगाव येथील लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर स्वाती लवंगारे यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

Illegal abortion racket : दौंड तालुक्यात अवैध गर्भपाताच्या घटनांची (Illegal abortion racket) मालिका उघड होत असताना आता केडगाव येथील लवंगारे मॅटर्निटी अँड इन्फर्टिलिटी हॉस्पिटलच्या डॉक्टर स्वाती लवंगारे यांच्यावर यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
स्त्रीरोगतज्ञ नसतानाही गर्भपाताच्या (Illegal abortion racket) गोळ्यांचा बेकायदा साठा करून गर्भपात केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणात एका बड्या राजकीय नेत्याच्या संरक्षणामुळे यापूर्वीच्या तक्रारी दाबल्या गेल्याचाही आरोप समोर आला आहे.
दौंड ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गुजर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, डॉ. स्वाती लवंगारे (रा. केडगाव) आणि डॉ. तुकाराम यशवंत मोटे (रा. उरुळी कांचन, ता. हवेली) यांनी ६ जून २०२६ रोजी गर्भपाताच्या गोळ्यांचा साठा करून अवैध गर्भपात केल्याचे निदर्शनास आले. तपासादरम्यान गर्भपाताच्या गोळ्यांची नोंद असलेल्या कागदपत्रांवर डॉ. तुकाराम मोटे यांच्या सह्या आढळून आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तक्रारीनुसार, वरवंड परिसरातील एका प्रभावशाली राजकीय नेत्याच्या आशीर्वादामुळे डॉ. लवंगारे यांच्याविरोधातील अनेक तक्रारी यापूर्वी दडपण्यात आल्या. काही तक्रारदारांना धमक्या देण्यात आल्या, तर काहींना आर्थिक आमिष दाखवून गप्प करण्यात आल्याचा गंभीर आरोपही करण्यात आला आहे.
वैद्यकीय नियमांचे उल्लंघन करून स्त्रीरोगतज्ञ नसताना गर्भपात करणे, तसेच गर्भपाताच्या औषधांचा बेकायदा साठा ठेवणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या प्रकरणामुळे दौंड तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेतील अनियमितता पुन्हा एकदा समोर आली आहे.
घटनेनंतर महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. संबंधित हॉस्पिटल सील करून संपूर्ण आर्थिक व्यवहार, रुग्ण नोंदी आणि औषधसाठ्याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
यवत पोलिसांनी दोन्ही डॉक्टरांविरोधात विविध कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, राजकीय संरक्षणाचे आरोप कितपत खरे आहेत, याचा तपास आता महत्त्वाचा ठरणार आहे.
दौंड तालुका आधीच गर्भलिंग निदान आणि अवैध वैद्यकीय प्रकारांमुळे चर्चेत असताना, अवैध गर्भपाताच्या (Illegal abortion racket) या नव्या प्रकरणाने प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेसमोर गंभीर प्रश्न उभे केले आहेत. या रॅकेटचे मूळ शोधून दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.






