इन्टाग्रामवर पोस्ट लाइक करणं पडलं महागात; चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडेची आर्थिक फसवणूक
Updated On:

Sagar karande | सोशल मीडियावरुन पैसे कमवण्याच्या स्किम्समुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. अनेकांना साइबर चोरट्यांनी गंडा घालत मोठी रक्कम अॅानलाइन पद्धतीने खात्यातून वर्ग करत आर्थिक फसवणूक केली आहे. या आर्थिक फसवणुकीला मराठीतील एक अभिनेता बळी पडला असून त्याचीही मोठी आर्थिक फसवणूक सायबर चोरट्यांनी केली आहे.
चला हवा येऊ द्या फेम सागर कारंडे याला इंन्स्टाग्रावर पोस्ट लाइक करणं महागात पडले असून त्याची तब्बल ६१.८३ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सागर कारंडेने पुणे सायबर पोलिस ठाण्यात (उत्तर विभाग) तक्रार नोंदवली आहे. नागरिकांनी त्याने अॅानलाइन स्कॅमपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
सागर हा सोशल मीडियावर सक्रिय असतो. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो चाहत्यांसाठी फोटो व्हिडिओ नेहमी शेअर करत असतो. सागरला फेब्रुवारी महिन्यात त्याच्या व्हॉट्सअॅप नंबरवर एका महिलेचा मेसेज आला. या महिलेने इंन्स्टाग्रावर लाईकसाठी १५० रुपये मिळतील सांगितले.
त्यानंतर टेलीग्राम आणि सोशल मीडियावरील एक लिंक सागराला पाठवली. घरबसल्या पैसे कमावण्याच्या या संधीने तो प्रभावित झाला. सुरुवातीला यातून त्याचे ११ हजार रुपयांचे दहा व्यवहार झाले, ज्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला आणि त्याने यामध्ये आणखी पैसे गुंतवले. मात्र, त्यानंतर त्याची मोठी आर्थिक फसवणूक झाली.
सागरला सुरुवातील कमी रक्कमेची मागणी करत विश्वास संपादन केला. त्यानंतर अधिक कमाईसाठी त्याला गुतंवणूक करण्यास भाग पाडले. यातून जमा होणारी रक्कम वॅालेटमध्ये जमा केली. काही काळानंतर २७ लाख रुपये काढण्याचा प्रयत्न सागरने केला. मात्र, ८० टक्के काम पूर्ण झाले आहे पैस काढण्यासाठी १०० टक्के काम पूर्ण होणे गरजेचे असल्याचे त्याला सांगण्यात आले.
पुढील टप्प्यात त्याला सांगण्यात आले की, १९ लाख रुपये गुंतवावे लागतील, त्यानंतर ३० टक्के टॅक्स भरावा लागेल. अन्यथा पैसे काढता येणार नाही, अशा प्रकारे सागर करांडेंकडून तब्बल ६१.८३ लाख रुपये उकळण्यात आले. यानंतर चुकीच्या खात्यात पैसे गेल्याचे सागरला सांगण्यात आले. यानंतर त्याला संशय आला आणि आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात येताच त्याने सायबर पोलिस हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रार दिली.





