Female Judge : सुप्रीम कोर्टात महिला न्यायाधीशांची संख्या वाढण्याची शक्यता; सुनीता अग्रवाल यांची कॉलेजियमकडून शिफारस
सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता असून ३ महिला न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात दिसण्याची शक्यता आहे.

Female Judge – गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश सुनीता अग्रवाल यांच्या सर्वोच्च न्यायालयातील पदोन्नतीची कॉलेजियमने शिफारस केल्याने, सर्वोच्च न्यायालयातील महिला न्यायाधीशांची संख्या लवकरच वाढण्याची शक्यता असून ३ महिला न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात दिसण्याची शक्यता आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, न्यायमूर्ती अग्रवाल यांच्यासोबत दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश अपारेश कुमार सिंग यांच्या नावांनाही सर्वोच्च न्यायालयात पदोन्नतीसाठी लवकरच मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.
सध्या सर्वोच्च न्यायालयात दोन महिला न्यायाधीश कार्यरत आहेत. न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना ३१ ऑगस्ट २०२१ पासून सर्वोच्च न्यायालयात आहेत, तर न्यायमूर्ती वेंकिटा सुब्रमणी मोहना यांची यावर्षी २ जून रोजी सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती झाली.
न्यायमूर्ती अग्रवाल यांची पदोन्नती झाल्यास, न्या. अग्रवाल आणि न्या. नागरत्ना यांची उच्च न्यायालयातील न्यायाधीश म्हणून पार्श्वभूमी असेल. न्यायमूर्ती मोहना यांची सर्वोच्च न्यायालयात थेट बारमधून नियुक्ती झाली असून, त्या सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील होत्या. न्यायमूर्ती नागरत्ना २०२७ मध्ये एका महिन्यापेक्षा अधिक काळ भारताच्या सरन्यायाधीशपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.
२१ वर्षे वकिलीचा अनुभव
न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल यांनी डिसेंबर १९९० मध्ये वकिलीची नोंदणी केली. सुमारे २१ वर्षांच्या वकिली अनुभवानंतर नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. ऑगस्ट २०१३ मध्ये त्यांनी कायमस्वरूपी न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. न्यायमूर्ती अग्रवाल प्रशिक्षित आणि प्रमाणित मध्यस्थ (मेडिएटर) आहेत.
अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या मध्यस्थी आणि समेट प्रक्रियेच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या तुकडीतील त्या सदस्य होत्या. गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदाची जबाबदारी स्वीकारण्यापूर्वी त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दीर्घकाळ न्यायाधीश म्हणून काम केले आहे.





