पुणे – शहरात मागील दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. शनिवारी (दि. २८) दिवसभर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरी पडल्या. वडगावशेरी, चंदननगर आणि खराडी परिसरात पावसाच्या एक ते दोन सरी जोरदार पडल्या. शिवाजीनगर येथे अवघ्या एक मिमी पावसाची नोंद झाली. शहरासह जिल्ह्यात मंगळवारी (दि.२४) सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची धांदल उडवली. सलग तीन दिवस जोरदार बरसल्यानंतर पावसाचा जोर कमी झाला. आज सकाळपासून हवामान कोरडे असल्यामुळे सुर्यनारायणाचेही दर्शन झाले. दिवसभर ऊन आणि ढगाळ वातावरणाचा खेळ सुरू होता. वडगावशेरी, खराडी, विश्रांतवाडी येथील काही भाग सोडला तर शहराच्या मध्यवर्ती भागासह अन्य उपनगरात पावसाची भूरभूर तर काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. वडगावशेरी परिसरात पावसाची एक सर जोरदार आल्यामुळे रस्त्यावर पाणी साचले. दरम्यान, पुढील २४ तासांत शहरासह जिल्ह्यात हलक्या ते मध्यम सरी पडतील. दि. ३० सप्टेंबरनंतर पुढील चार दिवस हवामान ढगाळ तर हलक्या सरींची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.