विद्यार्थ्याला मारहाण करणारे ग्रंथपाल सक्तीच्या रजेवर

दहिवडी – येथील महात्मा गांधी विद्यालयात सहावीतील विद्यार्थ्यांला शिक्षक दिनीच ग्रंथपालानेच बेदम मारहाण केल्याने पालकांमधून संताप व्यक्त होत आहे. या घटनेनंतर रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवांनी तातडीने आदेश काढून ग्रंथपालाला सक्तीच्या रजेवर पाठविले.
ग्रंथपाल रवींद्र सदाशिव जंगम यांना उलटसुलट बोलल्यामुळे विद्यार्थ्याला केलेल्या मारहाणीचा विषय शिक्षकांनी दडपण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, विद्यार्थ्यांने पालकांना ही घटना सांगितल्यावर पालकांनी महात्मा गांधी विद्यालय गाठले. पालक व शिक्षकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली. त्यानंतर आक्रमक होत पालकाने पोलीस ठाणे गाठून ग्रंथपालाविरोधात तक्रार दाखल केली होती. काल सकाळी पालक व अन्य नागरिक आक्रमक होऊन त्यांनी महात्मा गांधी विद्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.
या आंदोलनास मनसे जिल्हाध्यक्षांनीही पाठिंबा देत या ग्रंथपालाला सक्तीच्या रजेवर पाठवावे व एवढ्या संवेदनशील घटनेकडे दुर्लक्ष करून पाठीशी घालू पाहणाऱ्या प्राचार्य व शिक्षकावरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. या आंदोलनावेळी ” विद्यार्थ्याला मारहाण करणाऱ्या शिक्षकांचा निषेध असो “अशी घोषणाबाजी करण्यात आली. योग्य ती कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही असे म्हणत पालकांनी व मनसैनिकांनी पाच वाजेपर्यंत प्रवेशद्वारासमोर ठिय्या मांडला होता. अखेर रयत शिक्षण संस्थेच्या सहसचिवांनी ग्रंथपालांना सक्तीच्या रजेवर पाठवून प्राचार्य व एका शिक्षकाची सात दिवसाच्या आत चौकशी करून त्यांच्यावरही योग्य कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
.





