Walmik karad : तुरुंगातील राड्यावर बीड कारागृह अधीक्षकांचे पत्र; म्हणाले, वाल्मिक कराडला मारहाण…

बीड : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडला बीड जिल्हा कारागृहात मारहाण करण्यात आल्याची घटना घडली. बीडच्या कारागृहात सकाळी कैद्यांच्या दोन गटात जोरदार राडा झाला. यावेळी वाल्मीक कराड आणि सुदर्शन घुले यांना मारहाण करण्यात आल्याचे वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले.
याबाबत आमदार सुरेश धस आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी प्रसार माध्यमांना माहिती दिली होती. या कारागृहाचे अधीक्षक मुस्लिम असल्याने ते रमजान ईदनिमित्ताने आज सुट्टीवर आहेत. त्यामुळे, कारागृहात मारहाणीची घटना घडली. त्यामध्ये, वाल्मिक कराडला एक-दोन चापटा मारण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले होते. मात्र, आता बीड जिल्हा कारागृह प्रशासनाने अधिकृत पत्रक जारी करत यासंदर्भात माहिती दिली आहे.
काय आहे पत्रकात?
बीड जिल्हा कारागृह पत्रकात म्हटले आहे की, आज 31 मार्च 2025 रोजी रोजी न्यायाधीन बंदी नामे सुदिप रावसाहेब सोनवणे व न्यायाधीन बंदी राजेश अशोक वाघमोडे हे दोघे आपआपले सर्कल समोर सकाळी 9.15 ते 9.30 च्या सुमारास त्यांना लागू असलेल्या सुविधेनुसार नातेवाईक यांना दुरध्वनी करण्यासाठी आले होते. त्यावेळी, एकेमेकांकडे पाहुन त्या दोघांमध्ये शाब्दीक चकमक होऊन त्यांच्यामध्ये झटापटी होऊ लागली.
त्यावेळीच कर्तव्यावरील कारागृह कर्मचारी झटापटी सोडवत असताना इतर बंदी कारागृहाच्या सर्कलमध्ये धावत आले व गोंधळ व शिवीगाळ करू लागले. त्यावेळी, कर्तव्यावरील कर्मचारी यांनी परिस्थिती नियंत्रणात आणून बंद्यांना वेगवेगळे केले व बंद्यांना आपआपले यार्डमधील बरॅकमध्ये बंदीस्त करण्यात आले आहे. सदर घटनेमधील बंद्यावर कायदेशीर कारवाई करणेकरीता शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड येथे तक्रार दाखल करीत आहोत. सध्यस्थितीत कारागृहात शांतता आहे, अशी माहिती बीड जिल्हा कारागृह अधीक्षक बी.एन. मुलाणी यांनी याबाबतची माहिती पत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान, न्यायाधीन बंदी वाल्मिक कराड व त्याचे सहकारी बंदी सुदर्शन घले यांना कारागृहात बेदम मारहाण करण्यात आली अशी माहिती प्रसार माध्यमांवर सुरु आहे. मात्र, प्रत्यक्षात बंदी वाल्मिक कराड व सुदर्शन घुले यांना कोणत्याही प्रकारची मारहाण कारागृहात झालेली नाही, असेही अधीक्षक मुलाणी यांनी या पत्रकात म्हटले आहे.
बबन गीतेची पोस्ट चर्चेत
बीड जिल्हा कारागृहात कैद्यांमध्ये मारहाणीची घटना घडल्यानंतर बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी शशिकांत ऊर्फ बबन गीते याने आपल्या फेसबुक पेजवरून केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली. त्याने आपल्या पेजवर स्वतःचा फोटो पोस्ट करत ‘अंदर मारना या मरना सब कुछ माफ है,’ अशी ओळ लिहिली आहे. याची जोरदार चर्चा आता बीडमध्ये होत आहे.





