“राज ठाकरे सोडाच, उद्धवजींसोबतही लढणार नाही”, भाई जगतापांचे BMC निवडणुकीबाबत मोठं विधान

Bhai Jagtap | काँग्रेस नेते भाई जगताप यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. काँग्रेस पक्ष हा ठाकरे बंधूंसोबत एकत्र लढणार नाही, असे जगताप यांनी सांगितल्याने राजकीय वर्तळात चर्चांना उधाण आले आहे.
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात, नेत्यांच्या नाही. जे काँग्रेस कार्यकर्ते गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत, त्यांचीही इच्छा असते, आपणही कधी ना कधी निवडणूक लढवावी. त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या. कोणी कोणासोबत लढायचे, हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या. आम्ही मुंबईतील स्थानिक कार्यकर्ते असून आम्ही मुंबईत स्वबळावर लढूयात, असे काँग्रेसच्या बैठकीत सांगितल्याचे भाई जगताप यांनी म्हटले.
काँग्रेसने आजपर्यंत कधीही, ‘राज ठाकरेंना सोबत घेऊ’, असे म्हटलेले नाही. मविआत शिवसेना एकटीच नाही. उद्धव ठाकरे मविआत आले तेव्हा शिवसेना एकटीच होती. आता दोन शिवसेना झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत स्बळावर लढण्याबाबतचा निर्णय काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांवरच सोडावा. स्थानिक कार्यकर्त्यांची ठाकरे बंधूंसोबत एकत्र निवडणूक लढण्याची इच्छा नाही, असेही भाई जगताप यांनी सांगितले. याद्वारे काँग्रेसकडून स्थानिक पातळीवर आपले अस्तित्व प्रस्थापित करण्याचे संकेत दिल्याचे म्हटले जात आहे.
हेही वाचा





