पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – जिल्हा परिषदेत क्षेत्रातून महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमध्ये कार्यरत असलेल्या शाळांतील सुमारे ४५० शिक्षकांना जिल्हा परिषदेतील शाळांमध्ये समायोजन करण्यात येत आहे. मात्र, शिक्षकांच्या सेवा ज्येष्ठता यादीवर आक्षेप घेण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेत शिक्षक समायोजन होऊ शकले नाही. समायोजनाकडे शिक्षक पाठ फिरवित असल्याचे दिसून येत आहे. महापालिका क्षेत्रातील ३४ समाविष्ट गावांतील ४५० शिक्षकांना जिल्हा परिषदेत शाळेत सामावून घ्यावे, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आज समायोजन करण्यास सुरुवात करण्यात येणार होती. मात्र, शिक्षकांची संख्या पुरेशी नव्हती. त्यातच सेवा ज्येष्ठता यादीवरही आक्षेप घेतले गेल्याने ही प्रक्रिया सुरू होऊ शकली नाही. दरम्यान, शिक्षकांना सेवा ज्येष्ठता यादीनुसार जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांवर समायोजन केले जाणार आहे. परंतु, ही यादीच सदोष असल्याचे संघटनाचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे यादी प्रसिद्ध केली तरी त्यावर आक्षेप अथवा हरकती मांडण्यासाठी वेळही देण्यात आले नाही. त्यामुळे नियमानुसार सर्व आक्षेप घेऊनच सुधारित यादी प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर उद्या (दि.२५) दुपारी १२ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ देण्यात आले आहे. त्यानंतर यादी प्रसिद्ध केले जाणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे बाळासाहेब मारणे यांनी दिली. उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषदेत शिक्षक समायोजन करण्यात येत आहे. या यादीवर आक्षेप घेऊन सुधारित शिक्षकांची सेवा ज्येष्ठता यादी प्रसिद्ध केले जाईल. त्यानंतर समुपदेशनद्वारे शिक्षक समायोजन केले जाणार आहे.- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षक समायोजन करताना संवर्ग एक व संवर्ग दोन असे प्रकार आहेत. यासंदर्भात शासनाने प्रसिद्ध केलेल्या निर्णयानुसार पारदर्शी पद्धतीने शिक्षक समायोजन होणे आवश्यक आहे. मात्र, शिक्षक समायोजनासाठी जिल्हा परिषद इतकी घाई का करीत आहेत, हा प्रश्न आहे. – बाळासाहेब मारणे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ