प्रभात वृत्तसेवा शिक्रापूर – सध्या पुणे जिल्ह्यातील शिरूर, जुन्नर, खेड आणि आंबेगाव या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून, बिबट-मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ऊसाचे क्षेत्र मोठे असल्याने आणि पीक दोन-दोन वर्षे शेतात उभे राहत असल्याने, बिबटे या पिकांमध्येच प्रजनन करून आपला अधिवास बनवत आहेत.गेल्या पाच वर्षांत या तालुक्यांमध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात २२ नागरिकांचा आणि १६ हजार ६०० हून अधिक जनावरांचा बळी गेला आहे. शिरूर तालुक्यात वीस दिवसांत तिघांचा मृत्यू झाल्यामुळे अनेक घडामोडी व आंदोलने झाली. त्याची दखल उपमुख्यमंत्री, वनमंत्री, जिल्हाधिकारी, खासदार व आमदारांना घ्यावी लागली. त्यानंतर नरभक्षक बिबट्या ठार करत काही बिबटे पकडण्यात आले आहेत.सध्या वनविभागाकडून प्रत्येक ठिकाणी बिबट-मानव संघर्षाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. पुणे जिल्ह्यात बिबट संगोपनासाठी माणिकडोह येथे एकच निवारा केंद्र असल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी नवीन बिबट निवारा केंद्रे स्थापन झाल्यास बिबट्यांचे संगोपन होऊन शेतकऱ्यांचा त्रास कमी होण्यास मदत होईल, असे मत व्यक्त होत आहे. सध्याच्या घटना लक्षात घेता, बिबट आणि मानव संघर्ष थांबणे ही काळाची गरज आहे. शासकीय स्तरावर हालचाली सध्या बिबट-मानव संघर्ष टाळण्यासाठी शासकीय पातळीवर पुणे जिल्ह्यात नवीन बचाव केंद्र सुरू करणे, नरभक्षक बिबट्यांची नसबंदी करणे, बिबट्यांचा वावर असलेल्या भागात पोलीस व वनविभागाची गस्त वाढवणे, रेस्क्यू टीम व शासकीय वाहनांची संख्या वाढवणे याबाबत हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. शिरूर वनविभागाकडून जनजागृती शिरूर तालुक्यात शिरूर वनविभाग कर्मचारी आणि बिबट शीघ्र कृती दलाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बिबट असलेल्या ठिकाणी जाऊन जनजागृती करत असल्याने नागरिकांना बिबटबाबत योग्य माहिती मिळत आहे.