वाघोली : वाघोलीतील भाडळेवस्ती डीकॅथलॉन परिसरात वावर असणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद झाला असून बिबट्याच्या दहशतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाडळेवस्ती परिसरामध्ये मागील काही दिवसांपासून बिबट्याचे दर्शन होत होते. त्याने मेंढ्यांवर हल्ला देखील केला आहे. त्याचा वावर या नागरी वस्तीच्या भागामध्ये वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. वन विभागाचे कर्मचारी याठिकाणी पाहणी करून आढावा घेत होते. या बिबट्याला शुक्रवारी (दि.२५) पहाटे डिकॅथलॉनच्या सुरक्षा रक्षकांनी मोबाईल मध्ये टिपले होते. तो तेथील शेतात निघून जात होता. त्याचदिवशी सायंकाळी उशिरा शेतात वन विभागाकडून पिंजरा लावण्यात आला. मध्यरात्री एक वाजता तो पिंजऱ्यात जेरबंद झाला. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याला नेले. कोलवडी भागामध्ये देखील बिबट्याची दहशत अजूनही कायम असून याठिकाणी बिबट्याकडून प्राण्यांवर हल्ल्याच्या घटना घडत आहेत. याठिकाणी देखील पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करावे अशी मागणी नागरिक करीत आहेत.