Leopard Trapped – पिंपरखेड (ता.शिरूर) येथे शेतकरी काळूराम नाथा बराटे यांचे शेतात लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी (दि.१३) रोजी रात्री आठच्या सुमारास मादी संवर्गातील सहा वर्षीय बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून पकडण्यात आलेल्या बिबट्याची रवानगी माणिकडोह (ता.शिरूर) येथील बिबट निवारण केंद्रात करण्यात आली आहे. शिरूर तालुक्याच्या बेट भागातील पिंपरखेड जांबूत, फाकटे परिसरात अद्यापही बिबट्यांचा मुक्तसंचार सुरूच आहे ,मात्र नोव्हेंबर २०२५ मध्ये बिबट हल्ल्यात तिघांचा बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या वनविभागाकडून बिबट्यांना जेरबंद करण्याची मोहीम अद्यापही जोरदार चालू असल्याचे दिसून येत आहे. सद्यस्थितीत पिंपरखेड बीट कार्यक्षेत्रामध्ये तीन महिन्यात एकूण ३७ बिबट्यांना जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले असून बिबट संख्येच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पिंपरखेड परिसरात एकूण सोळा पिंजरे कार्यान्वित असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. मात्र सध्या ऊसतोडणीचा हंगाम संपत आला असल्याने काही भागात अन्न व पाण्याच्या शोधात बिबट्यांचा वावर आढळून येत असून हे बिबट देखील वनविभागाने पिंजरे लावून जेरबंद करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे. सदर बिबट जेरबंद करण्याची कारवाई सहायक वनसंरक्षक स्मिता राजहंस यांचे सूचनेवरून शिरूरचे वनपरिक्क्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल लहू केसकर, वनरक्षक महेंद्र दाते व कर्मचारी यांनी केल्या आहेत.