Leopard Captured : भराडीत दोन बिबटे पकडले, पण तिसरा अद्याप मोकाट; शेतकऱ्यांची धाकधूक वाढली
Leopard Captured : कुत्र्याच्या शिकारीनंतर वनविभागाने लावला होता पिंजरा; दोन दिवसांत दोन बिबटे जेरबंद झाले आहेत.

Leopard Captured – भराडी (ता.आंबेगाव) येथे वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सलग दुसऱ्या दिवशी बुधवार, दि.४ रोजी पहाटे बिबट (मादी) जेरबंद झाली. गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारा दुसरा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाला असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अजूनही एक बिबट्या या परिसरात असल्याचे शेतकरी सांगत आहे.
भराडी येथील वखारवाडी जवळ वास्तव्यास असलेले शेतकरी जितेंद्र गोरक्ष गावडे यांच्या रॉटविल या जातीच्या कुत्र्याची बिबट्याने शिकार केल्याची घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी शेतात पिंजरा लावण्यात आला होता. त्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद झाला होता. मात्र, त्याचवेळी बिबट्या जेरबंद झालेल्या पिंजऱ्याच्या बाहेर दुसरा बिबट्या बसलेला स्थानिक शेतकऱ्यांनी पाहिले होते.
तसेच दुपारी महिला जवळच्या शेतात कांदा खुरपणी करत असताना बिबटे हत्ती गवताच्या शेतात दिसले होते. त्यामुळे या ठिकाणी पुन्हा पिंजरा लावावा.अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली होती. वन विभागाने पुन्हा त्याच ठिकाणी पिंजरा लावला असता बुधवार, दि.४ रोजी पहाटे एक बिबट मादी पिंजऱ्यात जेरबंद झाली आहे.
या ठिकाणी आजपर्यंत एक बिबट मादी व एक बिबट असे दोन बिबटे जेरबंद झाले असून अजूनही एक बिबट्या परिसरात वावरत असल्याचे स्थानिक शेतकरी सांगत आहेत. वनविभागाने या बिबट्याला पकडण्यासाठी देखील पिंजरा लावावा,अशी मागणी जितेंद्र गावडे यांनी केली आहे.





