Leopard News: शिरूर तालुक्यात पुन्हा बिबट्यांचा थरार! ४-५ बिबटे एकत्र फिरतानाचा व्हिडिओ व्हायरल; नागरिक हादरले
Leopard News: शिरूर तालुक्यातील जांबुत येथील पठारेवस्ती आणि शिस्तारवस्ती परिसरात ४ ते ५ बिबट्यांचा वावर; मागील ५ बळींच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट.

Leopard News- बिबट प्रवण क्षेत्र म्हणून घोषित झालेल्या जांबूत (ता. शिरूर) येथील अतिसंवेदनशील भागात पुन्हा एकदा बिबट्यांच्या भीतीने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. पठारेवस्ती, शिस्तारवस्ती परिसरात चार ते पाच बिबटे समूहाने फिरत असल्याचा व्हिडीओ सध्या सोशियल मीडिया वर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असताना दिसून येत असल्याने नागरिकांनी तातडीने उपाययोजनाची मागणी केली आहे.
जांबूत गावच्या कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत पाच जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागल्याने याचा घटनांची पुनरावृत्ती पुन्हा घडण्याची भीती वर्तविली जात आहे. मागील आठवडाभरात सातत्याने समूहाने बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतात काम करण्यासाठी जाण्यास शेतकरी आणि मजूर यांचे धाडस होत नाही तर दुसऱ्या बाजूला शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करा अन्यथा विद्यार्थ्यांना शाळेत पाठविणार नसल्याचे काही पालकांनी यावेळी सांगितले.
या भागात बिबट्यांची वाढती संख्या धोकादायक ठरत असून मागील घटनांचे गांभीर्य लक्षात घेता त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. बिबटे निदर्शनास आल्यावर संबंधित ठिकाणी पिंजरे लावले जातात. मात्र, त्यामध्ये ठेवले जाणारे भक्ष हे अनेकदा मृत झाल्याचे दिसून येत आहे. यासाठी वनविभागाकडून लावण्यात येणाऱ्या पिंजऱ्यात योग्य पद्धतीचे भक्ष ठेऊन बिबट्याना जेरबंद करावे तसेच बिबट्याची अधिकची संख्या पाहता वाईल्ड लाईफ टीमला पाचरण करून ज्या भागात बिबट्याची अतिरिक्त संख्या आहे. त्या भागातील बिबटे तांत्रिक पद्धतीने जेरबंद करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
युवकांवरील गुन्हे तातडीने मागे घ्या
जांबूत आणि पिंपरखेड (ता. शिरूर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात दोन निष्पाप बालकांसह इतर सात जणांना आपला जीव गमवावा लागला. या घटनांचे पडसाद उमटल्यानंतर संतप्त जमावाकडून वनविभागाचे वाहन जाळण्यात येऊन बेस कॅम्पचे नुकसान झाले होते. यानंतर वनविभाग आणि पोलीस प्रशासनाकडून ज्या युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. ते करण्यात येऊ नयेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात येतील, असे आश्वासन वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले असताना देखील या युवकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात येत आहे.





