Leopard News: चांडोहमध्ये ६ वर्षांची बिबट मादी जेरबंद; वनविभागाची मोठी कारवाई

प्रभात वृत्तसेवा
जांबूत – चांडोह (ता. शिरूर) येथे शेतकरी हर्षल भुजबळ यांच्या शेतात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात रविवारी (दि. २२) पहाटे सहा वर्षे वयाची बिबट मादी जेरबंद झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार वाढल्याने नागरिक भयभीत झाले होते, या पार्श्वभूमीवर वनविभागाला मिळालेले हे यश महत्त्वाचे मानले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरखेड, जांबूत, चांडोह आणि फाकटे या परिसरात बिबट्यांची मोठी दहशत आहे. वनविभागाने गेल्या दोन महिन्यात या भागातून सुमारे २५ बिबटे जेरबंद केले आहेत, मात्र तरीही दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
या बिबट मादीला पुढील उपचार आणि निरीक्षणासाठी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असल्याची माहिती वनरक्षक लहू केसकर यांनी दिली.वनविभागाने शासनाच्या आदेशानुसार या भागात पिंजरे लावण्याची मोहीम तीव्र केली आहे.
चांडोहमध्ये बिबट्या पकडला गेल्याने परिसरातील नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी भविष्यातील धोका लक्षात घेता वनविभागाने अधिकाधिक पिंजरे लावून हा परिसर बिबटमुक्त करावा, अशी आग्रही मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.





