नेवासा शिवारात धुमाकूळ घालणारा बिबट्या जेरबंद !

नेवासा – बहिरवाडी (ता. नेवासा) शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचे दर्शन शेतकऱ्यांना होत असल्यामुळे वाड्या – वस्त्यांवरील शेतकरी वर्ग आणि शाळकरी मुलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
त्यामुळे वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी परिसरातून केली जात असतांना वनविभागाने बहिरवाडी शिवारात पिंजरा लावून यशस्वीपणे बिबट्याला जेरबंद केलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मंगळवार (दि. २३) रोजी वनविभागाकडून पिंजरा लावल्यानंतर बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास या बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात वनविभागाला सश आले.
बुधवारी सकाळपासूनच सुरु असलेल्या पावसामुळे पिंजऱ्यात अडकलेल्या बिबट्याला टॅक्ट्रच्या सहाय्याने पिंजऱ्यातून नेवासा फाटा येथील वनविभाग कार्यालयात आणण्यात आले आहे. या बिबट्याने गेल्या महीनाभरापासून परिसरात अनेक ठिकाणी शेळ्या, कुत्रे फस्त केल्याची घटना घडलेली होती.
बिबट्याच्या वावरामुळे परिसरात प्रचंड घबराहट निर्माण झालेली होती शेतकऱ्यांना शेतीचे कामे जीव मुठीत धरुन करावे लागत होते. तर शाळकरी विद्यार्थ्यांना बिबट्याच्या धास्तीमुळे शाळेत जाण्यासाठी भीती वाटत होती.
मात्र आज बिबट्याला जेरबंद केल्यामुळे शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला व वनविभागाला धन्यवाद दिले. बिबट्याला यशस्वीरित्या पिंजऱ्यात अडकविण्यासाठी वनरक्षक शिसोदे, वनपाल पातारे, कानडे, वनकर्मचारी मोरे, गाढे, घोरपडे यांनी विशेष सहाय्य केले.





