Leopard Cubs : रांजणीत आढळली बिबट्याची तीन पिल्ले! ऊस तोडणी दरम्यान मजुरांची उडाली गाळण; वनविभाग सतर्क
Leopard Cubs : डोळे न उघडलेली पिल्ले सुखरूप; आईच्या स्वाधीन करण्यासाठी वनविभागाकडून ट्रॅप कॅमेरे आणि शीघ्र कृती दलाची तैनाती.

Leopard Cubs – आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथे ऊस तोडणी सुरू असताना ऊस तोड मजुरांना बुधवारी (दि.11) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बिबट्याची तीन डोळे न उघडलेली पिल्ले आढळून आली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.रांजणी येथील कैलास बबन वाघ यांच्या शेतात उसाची तोडणी सुरू होती. सकाळी नऊ वाजता ऊस तोड कामगार कामासाठी शेतात गेले असता त्यांना उसामध्ये तीन लहान बिबट्याची पिल्ले दिसली.
कामगारांनी तात्काळ ऊस उत्पादक शेतकरी कैलास वाघ यांना याबाबत माहिती दिली. भीतीपोटी ऊस तोडणीचे काम तात्पुरते थांबवण्यात आले. ग्रामस्थांनी त्वरित मंचर येथील वन विभागाला कळविले. प्राथमिक माहितीनुसार या पिल्लांचा नुकताच जन्म झालेला असून ती अंदाजे दहा ते पंधरा दिवसांची आहेत. विशेष म्हणजे या पिल्लांचे डोळे अद्याप उघडलेले नाहीत.
मंचरचे वनपरिक्षेत्र अधिकारी विकास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे शीघ्र कृती दल तसेच रेस्क्यू टीमचे सदस्य शारदा राजगुरव व दत्तात्रेय राजगुरव, वनरक्षक बालाजी पोत्रे घटनास्थळी दाखल झाले. पिल्लांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. बिबट्याची मादी आक्रमक होऊ नये म्हणून पिल्ले ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी सुरक्षित ठेवण्यात आली आहेत.
वन विभागाने त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले असून बिबट्याच्या मादीच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी अफवा पसरवू नयेत तसेच वन विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.यावेळी सरपंच छायाताई वाघ, शांताराम वाघ, निलेश साळी, अविनाश वाघ, जयसिंग लोंढे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.





