Leopard Cubs : बिबट्याचा वावर वाढला! दोन दिवसांनंतर पुन्हा ३ बछडे आढळले; वनविभागाची धाव
Leopard Cubs : दोन दिवसांपूर्वीच दोन बछड्यांचे झाले होते पुनर्मिलन; आता पुन्हा तीन बछडे आढळल्याने वनविभागासमोर आव्हान.

Leopard Cubs – आंबळे (ता. शिरूर) येथे ऊस तोडणी सुरू असताना एका शेतात बिबट्याचे तीन बछडे पुन्हा आढळले आहेत. दोन दिवसांपूर्वीच याच परिसरात दोन बछडे सापडले होते आणि त्यांचे आईशी पुनर्मिलन करण्यात वनविभागाला यश आले होते. मात्र, आता पुन्हा तीन बछडे सापडल्याने ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आंबळे येथील प्रकाश बेंद्रे यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू असताना कामगारांना हे तीन बछडे दिसले. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी निळकंठ गव्हाणे व वनपरिमंडल अधिकारी भानुदास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाचे पथक आणि रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली.
नियतक्षेत्र वनअधिकारी गणेश झिरपे, शेरखान शेख, वैभव निकाळजे, गणेश टिळेकर आणि शुभांगी टिळेकर यांनी बछड्यांना सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले.प्रकाश बेंद्रे, विकास उकले, मुकुंद भिवरे आणि शशिकांत संकपाळ यांच्या उपस्थितीत या बछड्यांना त्यांच्या आईशी पुनर्मिलन घडवण्यासाठी पुन्हा शेतात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.
वनविभागाने परिसरातील शेतकऱ्यांना शेतात काम करताना काळजी घेण्याचे आणि रात्रीच्या वेळी शेतात न फिरण्याचे आवाहन केले आहे. या वारंवार आढळणाऱ्या बछड्यांमुळे परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर असल्याचे स्पष्ट होत आहे.





