leopard cub rescue | एकाच दिवशी बिबट्याच्या पाच बछड्यांचे जीव वाचले ; ओतूरमध्ये वनविभागाची धडाकेबाज कारवाई

प्रभात वृत्तसेवा
ओतूर – जुन्नर तालुक्यातील ओतूर वनविभागाने एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणाहून बिबट्याच्या पाच बछड्यांना जीवदान दिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली.पहिली घटना शुक्रवारी दुपारी रोहोकडी येथे घडली. एका विहिरीमध्ये बिबट्याचा बछडा पडल्याची माहिती वनविभागाला मिळाली. त्यानंतर ओतूर वनविभागाचे पथक, बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने या नर बछड्याला (अंदाजे १ वर्ष वय) विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
त्याला सध्या माणिकडोह बिबट निवारण केंद्रात देखरेखीखाली ठेवले आहे. पूर्णपणे तंदुरुस्त झाल्यावर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले जाईल.दुसरी घटना शुक्रवारी सकाळी खामुंडी ते बदगी बेलापूर मार्गावरील बदगी घाटात घडली. एका खाकी कागदी खोक्यात चार बिबट्याचे बछडे ठेवलेले असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. वनक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण आणि वनरक्षक विश्वनाथ बेले यांनी घटनास्थळी धाव घेतली.
तिथे त्यांना अंदाजे पंधरा दिवसांचे, डोळेही न उघडलेले दोन नर आणि दोन मादी बछडे आढळले. या बछड्यांना वैद्यकीय तपासणीसाठी माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हे बछडे कोणी आणून ठेवले याचा शोध घेण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे. बदगी घाटात आढळलेल्या बछड्यांबाबत कोणालाही माहिती असल्यास वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन चव्हाण यांनी केले. जेणेकरून बछड्यांना त्यांच्या आईसोबत पुन्हा एकत्र आणता येईल.
“जुन्नर तालुक्यातील अनेक गावे बिबट प्रवण क्षेत्रात येतात. नागरिकांनी किंवा शेतकऱ्यांनी बिबट किंवा त्यांचे बछडे दिसल्यास त्वरित वनविभागाला कळवावे. बछड्यांना हात लावू नये किंवा त्यांच्या जवळ जाऊ नये. त्यांची मादी बिबट अचानक हल्ला करू शकते.”
– प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी



