बिबट्याच्या दहशतीने रात्रीची अघोषित संचारबंदी

पावलांचे ठसे अन् बिबट्याचे दर्शन होऊ लागल्याने भीतीचे वातावरण
श्रीगोंदा – तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील बागायती पट्टयात बिबट्या असल्याच्या चर्चांमुळे अक्षरशः दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, अनेक भागात सायंकाळी लवकरच अघोषित संचारबंदी सारखे चित्र बघायला मिळत आहे. या भागात बिबट्या आहे हे स्पष्ट असले तरी त्यांच्या संख्येबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नाही.
तालुक्यातील वांगदरी, सांगवी दुमाला, शिरसगाव बोडखा, निमगाव खलु, मढेवडगावचा पश्चिम आणि दक्षिण भाग, काष्टीतील राहिंजपट आणि दांगटपट, म्हातारपिंपरी हद्दीतील रेल्वेस्थानक परिसर, लिंपणगाव हद्दीतील कुकडी वसाहत आदी गावांच्या बागायती पट्टयात सध्या बिबट्याच्या वावरच्या चर्चेने दहशत पसरली आहे. काही भागात बिबट्या असल्याचे अनेकांना दर्शन झाले आहे. तर काही भागात फक्त बिबट्या चर्चेनेच घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या पंधरवड्यात सांगवी दुमाला येथे बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्याच्या पूर्वसंध्येला बिबट्याने दोन शेळ्यांचा फडशा पाडला होता.दोन महिन्यांपूर्वी त्याच भगत बिबट्याचे तीन बछडे सापडले होते. दोन आठवड्यांपूर्वी वांगदरी शिवारातील जाधववस्ती येथे बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला होता. तर मागील आठवड्यात काष्टी शिवारातील राहिंजपटामध्ये दोन तरुणांनी रात्रीचा शेतात बिबट्या दिसला होता. बिबट्याच्या संचाराने या बागायती भागात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीची या भागात अघोषित संचारबंदीची स्थिती बघायला मिळते. संध्याकाळी अंधार पडल्यानंतर वाड्या-वस्त्यावरील लोक घराबाहेर पडण्यास धजावत नाहीत.
विजेच्या भारनियमनामुळे ज्या भागात रात्रीची वीज असते, तेथे शेतकऱ्यांना विजपंप चालू करण्यासाठी आणि भरणे करण्यासाठी रात्रीचे शेतात जाण्यावाचून पर्याय राहत नाही. यामुळे एकीकडे बिबट्याची भीती आणि दुसरीकडे केवळ रात्रीची असणारी वीज यामध्ये शेतकऱ्यांची अवस्था ‘इकडे आड, तिकडे विहीर’ अशी होत आहे.त्यामुळे भीमा पट्टयासह घोड कालव्याखालील बागायती भागात शेतीपंपांना रात्रीऐवजी दिवसा वीज देण्याची मागणी शेतकरी करू लागले आहेत.
काहींना बिबट्याचे थेट दर्शन झाले आहे, तर काही बिबट्याच्या पावलांचे ठसे पाहिल्याचे सांगतात. या भागात बिबट्याकडून कुत्रे, शेळ्या, मेंढ्या यासारख्या पाळीव प्राण्यांवर होणाऱ्या हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. त्यामुळे या बागायती भागातील रहिवासी देखील दहशतीखाली वावरत आहेत. वनविभागाने या भागातील बिबटे पकडण्यासाठी वेगाने हालचाली करणे अत्यावश्यक बनले आहे. तोपर्यंत मात्र बिबट्याच्या खुलेआम वावराने निर्माण झालेली दहशत कायम राहणार आहे.





