Leopard Attack: पुरंदरमध्ये बिबट्याची दहशत! दौंडजमध्ये गायीचा फडशा पाडला; शेतकऱ्यांमध्ये भीतीची लाट

प्रभात वृत्तसेवा
वाल्हे – दौंडज (ता. पुरंदर) हद्दीत परिसरात पुन्हा नलावडेवाडी जवळील जुनावना येथे बिबट्याने एका गाईचा फडशा पाडल्याची घटना शनिवार (दि.२९) सकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. मागील दोन-तीन दिवसांपूर्वी पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावर गुजरमळा येथे बिबट्याचे दर्शन झाले होते. यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दौंडज हद्दीतील नलावडेवाडी येथील रहिवासी सुभाष भिवा माने यांचा जुना खंडोबा गडाच्या पायथ्यालगत जुनावना परिसरामध्ये जनावरांचा गोठा असून ते दुग्ध व्यवसायदेखील करतात. शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते आपल्या गोठ्याकडे गेले असता गोठ्यातील गाईवर हल्ला करून बिबट्याने भक्ष्य केले ही बाब त्यांच्या निदर्शनास आली. यानंतर माने यांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले व वनपाल दीपाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक धनंजय देवकर यांनी तत्काळ दखल घेऊन घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला.दरम्यान, संबंधित शेतकऱ्यांला वनविभागाकडून तत्काळ आर्थिक नुकसान भरपाई मिळावी.
बिबट्याच्या वावरामुळे परिसरात शेतकऱ्यांसह शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रब्बी हंगामातील बहुतांश पिकांचे कामे सुरू असून, बिबट्याच्या वावर वाढल्याने, शेतीची कामे ठप्प होतील. या भागात भितीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पोलीस पाटील दिनेश जाधव यांनी केली आहे.





