Leopard Attack: बिबट्याची दुचाकीवर झडप! शेतमजूर जखमी, चालकाच्या प्रसंगावधानाने टळला मोठा अनर्थ
Leopard Attack: शिरूर तालुक्यातील फाकटे येथून शेतीकाम करून दुचाकीवरून परतताना शिंगवे येथील ओढ्याजवळ बिबट्याचा हल्ला.

Leopard Attack – आंबेगाव तालुक्यातील शिंगवे गावाच्या हद्दीतील टाकेमळा परिसरात रविवार, दि.१२ रोजी सायंकाळी बिबट्याने दुचाकीवरून घरी परतणाऱ्या शेतमजुरावर हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात नागापूर येथील सुरेश रामचंद्र केदारी (वय ४५) हे जखमी झाले असून,परिसरात पुन्हा बिबट्याच्या वावरामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुरेश केदारी हे शिरूर तालुक्यातील फाकटे येथे शेतीकाम करून शेतमालक अनिल बढेकर यांच्यासमवेत दुचाकीवरून नागापूरकडे परतत होते.
शिंगवे येथील टाकेमळा परिसरातील ओढ्याजवळ पोहोचताच अचानक बिबट्याने दुचाकीवर झडप घातली. मागे बसलेल्या केदारी यांच्या हातातील डब्याच्या पिशवीवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी त्याचा पंजा केदारी यांच्या डाव्या मांडीला लागल्याने ते जखमी झाले. हल्ल्यानंतर बिबट्याने काही अंतर दुचाकीचा पाठलाग केला. मात्र, चालक अनिल बढेकर यांनी प्रसंगावधान राखत दुचाकीचा वेग वाढविल्याने दोघांचे प्राण वाचले.
जखमी केदारी यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वन परिक्षेत्र अधिकारी विकास भोसले व वनरक्षक बालाजी पोतरे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमीची विचारपूस केली. दरम्यान,शिंगवे,नागापूर आणि परिसरातील नागरिकांनी वन विभागाने तातडीने गस्त वाढवून बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी केली आहे.





