Leopard Rescue – हवेली तालुक्यातील सांगवी सांडस येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला पुणे वनविभागाने अत्यंत शिताफीने बाहेर काढत त्याचे प्राण वाचवले. या धाडसी आणि नियोजनबद्ध बचावकार्यामुळे वनविभागाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगवी सांडस येथील सर्जेराव मानाजी सातव यांच्या शेतातील विहिरीत बिबट्या पडल्याची माहिती आज पहाटे सुमारे पाच वाजता वनविभागाला मिळाली. त्यानंतर वनसंरक्षक आशिष ठाकरे व उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश वरक यांच्या नेतृत्वाखाली अत्यंत काळजीपूर्वक व कुशलतेने बचावमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान बिबट्याला कोणतीही इजा न होता सुरक्षितपणे विहिरीतून बाहेर काढण्यात यश आले. यानंतर बिबट्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला बावधन येथील वन्यप्राणी उपचार केंद्रात हलविण्यात आले. या संपूर्ण कारवाईत वनपरिमंडळ अधिकारी प्रमोद रासकर, वनरक्षक अनिल राठोड, अंकुश कचरे, पूजा कुबल, प्रीती नागले, प्रिया अकेन, कोमल सपकाळ, ऋतुजा कचरे तसेच वनसेवक बापू बाजारे यांनी मोलाची भूमिका बजावली. याकामी लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिता राठोड यांचेही सहकार्य लाभले. अत्यंत धोकादायक परिस्थितीत जीवाची पर्वा न करता वन्यजीवांचे प्राण वाचवण्यासाठी वनविभागाने दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता निश्चितच कौतुकास्पद असून, या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये वनविभागाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.