Leopard attack | दौंडकरवाडीत बिबट्याचा धुमाकूळ ; 16 करडांचा मृत्यू

प्रभात वृत्तसेवा
राजगुरूनगर – दौंडकरवाडी (रामनगर, ता. खेड) येथे आज बुधवारी (दि. 3) सायंकाळी पाचच्या सुमारास बिबट्याने शेतकरी भरत शिवराम लांडे यांच्या शेळ्यांच्या गोठ्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तब्बल सोळा शेळ्यांची पिल्ले (करडे) मृत्यूमुखी पडली. यामध्ये शेतकर्याचे अंदाजे दीड लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकरी भरत लांडे हे आपल्या शेळ्या चारण्यासाठी शिवारात गेले असता पाठीमागून बिबट्याने गोठ्यावर धाड घातली.
हल्ल्याची माहिती मिळताच ग्रामस्थांनी चाकण वनविभागाला कळवले. त्यानंतर वनपाल पवन आहेर, वनरक्षक सागर चव्हाण, रावसाहेब चौरे, अनिल खांडेकर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या घटनेनंतर दौंडकरवाडीत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गावातील नागरिक रात्रभर शेळ्या व पाळीव प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत धास्तावले आहेत. दौंडकरवाडीचे सरपंच सिताराम गुजर यांनी वनखात्याच्या अधिकार्यांना तातडीने बिबट्याचा शोध घेऊन बंदोबस्त करण्याची मागणी केली. तसेच शेतकरी भरत लांडे यांना झालेल्या नुकसानीबाबत योग्य ती नुकसानभरपाई देण्याचे आवाहन केले.
गावकर्यांचे म्हणणे आहे की, परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर सुरू आहे. त्यामुळे लहान मुलांना व जनावरांना धोका निर्माण झाला असून वनखात्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही स्थानिक पातळीवरून होत आहे. बिबट्याच्या हल्ल्यात 16 शेळ्यांची पिल्ले मृत्युमुखी पडलीं आहेत. शेतकर्यांचे 1.5 लाख रुपये अंदाजे आर्थिक नुकसान झाले असून वनविभागाच्या अधिकार्यांमार्फत पंचनामा पूर्ण करण्यात आला आहे.





