Leicestershire Pitch Penalty : सौरव गांगुलीच्या बायोपिकचे शूटिंग लीसेस्टरशर क्लबला पडले महागात! ‘खराब पिच’मुळे २७ गुणांची वजावट अन् आर्थिक दंड
Leicestershire Pitch Penalty : ग्रेस रोडवर २० ते २३ ऑगस्ट दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात लीसेस्टरशरने ग्लॅमॉर्गनवर ४२ धावांनी विजय मिळवला होता.

Leicestershire Deducted 27 Points Fined For Poor Pitch Sourav Ganguly Biopic Shooting Excuse Rejected : इंग्लंडमधील प्रसिद्ध काउंटी क्लब लीसेस्टरशरवर (Leicestershire) खेळपट्टी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी क्रिकेट शिस्तपालन पॅनेलने (CDC) अत्यंत कडक कारवाई केली आहे. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या आगामी बायोपिकच्या शूटिंगमुळे ग्रेस रोड मैदानावरील पिचची अवस्था खराब झाल्याचा बचाव क्लबने मांडला होता. मात्र, पॅनेलने हा युक्तिवाद फेटाळून लावत क्लबचे २७ गुण वजा केले असून ५,००० पाउंड (सुमारे साडेसहा लाख रुपये) दंड ठोठावला आहे. या मोठ्या कारवाईमुळे लीसेस्टरशर क्लब ‘डिव्हिजन वन’मधून खाली घसरण्याच्या (Relegation) उंबरठ्यावर पोहोचला आहे.
ग्लेमॉर्गनविरुद्धच्या विजयाचे १९ गुण कापले; अतिरिक्त ८ गुणांचाही दंड!
ग्रेस रोडवर २० ते २३ ऑगस्ट दरम्यान खेळल्या गेलेल्या सामन्यात लीसेस्टरशरने ग्लॅमॉर्गनवर ४२ धावांनी विजय मिळवला होता. मात्र, पॅनेलने निकृष्ट दर्जाच्या खेळपट्टीबाबत तक्रार कायम ठेवत त्या विजयातून मिळालेले १९ गुण थेट रद्द केले आणि ८ अतिरिक्त गुणांची दंडात्मक कपात केली. क्लबकडे या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी १० दिवसांचा वेळ आहे. सध्या १२ सामन्यांत ८९ गुण असलेला हा संघ पहिल्या विभागात टिकून राहण्यासाठी आता हॅम्पशरविरुद्धचा सामना जिंकण्याच्या प्रचंड दबावात आला आहे.
‘शूटिंगमुळे पिच झाकण्याची परवानगी नव्हती’; ग्राऊंड्समनचा अजब दावा!
🚨 Huge penalty in County Cricket! 🚨
📉 The Penalty: Loss of all 19 points from the win, plus an 8-point penalty and a £5,000 fine.
🏏 The Reason: The ECB ruled the Grace Road pitch “poor” due to uneven bounce caused by “moving cracks” and dry conditions.
⚠️ The Impact: The… pic.twitter.com/C3Q6FpIydz
— CricketGully (@thecricketgully) September 17, 2026
मुख्य पिच क्युरेटर कॅलम लेविन यांनी स्पष्टीकरण दिले की, सामना सुरू होण्याच्या चार दिवस आधी कोणतीही पूर्वसूचना न देता मैदानात बॉलिवूड चित्रपटाचे शूटिंग झाले. त्यादरम्यान त्यांना पिचवर काम करण्याची किंवा ती झाकण्याची परवानगी नव्हती; शिवाय तापमान ३५ अंशांवर गेले होते. मात्र, एकाच दिवसाच्या शूटिंगमुळे संपूर्ण पिच खराब झाल्याचा हा दावा पॅनेलने साफ अमान्य केला.
खेळपट्टीवर चेंडूला ४३ वेळा असमान उसळी; जाणूनबुजून चूक नसल्याचा निष्कर्ष!
सामन्यादरम्यान खेळपट्टीवर मोठमोठ्या भेगा पडल्याने चेंडूला अनपेक्षित उसळी मिळत होती. मॅच रेफरी इयान रॅमेज यांनी आपल्या अहवालात असमान उसळीची तब्बल ४३ उदाहरणे नोंदवली. पॅनेलने लीसेस्टरशरने ही पिच जाणूनबुजून खराब केली नसली, तरी खेळपट्टी तयार करण्याची त्यांची पद्धत अत्यंत निष्काळजीपणाची होती, असा अंतिम निष्कर्ष काढत ही कडक शिक्षा सुनावली.





