Leh violence: लेह हिंसाचारात पाकिस्तानी संबंधाची चौकशी सुरू, लडाख डीजीपींनी सांगितलं… सोनम वांगचुक यांना अटक का केली?

Leh violence : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सुरू केलेल्या उपोषणाच्या 15व्या दिवशी लेह येथे हिंसक प्रदर्शनं झाली. यानंतर वांगचुक यांना अटक करून जोधपूर तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. या हिंसाचारात 17 सीआरपीएफ जवान आणि 70 हून अधिक नागरिक जखमी झाले असून, लडाखचे डीजीपी एस. डी. सिंह जामवाल यांनी मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितलं की, वांगचुक यांचं पाकिस्तानी कनेक्शन असल्याची शक्यता असून, याची सखोल चौकशी सुरू आहे.
पाकिस्तानी PIO चा वांगचुक यांच्याशी संपर्क –
डीजीपी जामवाल यांनी वांगचुक यांच्या अटकेचं समर्थन करताना सांगितलं की, त्यांच्या आंदोलनामुळे हिंसाचाराला खतपाणी मिळालं. वांगचुक यांच्या परदेश दौऱ्यांवर आणि इस्लामाबादमधील अधिकाऱ्यांशी कथित संवादावर पोलिसांचं लक्ष आहे. डीजीपींनी असा दावा केला की, हा हिंसाचार सुनियोजित होता. त्यांनी सांगितलं की, एका पाकिस्तानी PIO (पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन) व्यक्तीला अटक करण्यात आली असून, तो वांगचुक यांच्या संपर्कात होता आणि त्याला अहवाल देत होता. “आमच्याकडे याचा रेकॉर्ड आहे. हा व्यक्ती पाकिस्तानात ‘डॉन’च्या एका कार्यक्रमात सहभागी झाला होता आणि बांगलादेशलाही गेला होता,” असं डीजीपींनी नमूद केलं.
#WATCH | Leh: Speaking on the 24th Sept violence, Ladakh DGP Dr. S.D Singh Jamwal says, “…We also arrested a Pakistan PIO in the recent past who was in touch with him (Sonam Wangchuk) and reporting back across. We have a record of this. He had attended a Dawn event in Pakistan.… pic.twitter.com/q4YnhyrQlE
— ANI (@ANI) September 27, 2025
हिंसाचाराचं कारण आणि गोळीबार –
डीजीपींनी सांगितलं की, वांगचुक यांचा भडकावण्याचा इतिहास आहे. त्यांनी अरब स्प्रिंग, नेपाळ आणि बांगलादेशच्या घटनांचा उल्लेख केला आहे. तसंच, वांगचुक यांच्या वित्तपुरवठ्यावर FCRA उल्लंघनाच्या चौकशीचा दावा त्यांनी केला. 24 सप्टेंबरला लेहमधील हिंसाचारात 5,000-6,000 लोकांच्या जमावाने सरकारी इमारतींना नुकसान पोहोचवलं. यावेळी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला झाला, ज्यामध्ये एक जवान गंभीर जखमी झाला आहे. एका इमारतीत आग लावण्यात आली, जिथे 4 महिला पोलिस कर्मचारी होत्या. आत्मरक्षेसाठी गोळीबार करावा लागला, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय, 70-80 सुरक्षा कर्मचारी आणि तितक्याच संख्येने नागरिक जखमी झाले, ज्यामध्ये एका मुलीला दिल्लीत हलवण्यात आलं. डीजीपींनी स्वतःवरही हल्ला झाल्याचं सांगितलं, पण ते सुदैवाने बचावले.
सरकारशी चर्चेची प्रक्रिया आणि वांगचुक यांचा अडथळा –
डीजीपींनी सांगितलं की, लेह स्वायत्त पर्वतीय विकास परिषद (LAHDC) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) यांच्याशी सरकारची चर्चा सुरू आहे. मात्र, वांगचुक यांच्या सहाव्या अनुसूचीच्या मागणीमुळे आणि पूर्ण राज्याच्या दर्जाच्या मागणीमुळे ही प्रक्रिया बाधित होत आहे. त्यांनी दावा केला की, वांगचुक आणि त्यांच्या गटाने शांतता आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणण्यासाठी आंदोलनाचं व्यासपीठ हायजॅक केलं. 25-26 सप्टेंबरला दिल्लीत प्रारंभिक चर्चेची योजना आखली गेली होती, तरीही हिंसाचार घडला.
वांगचुक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह –
डीजीपींनी वांगचुक यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले आणि सांगितलं की, त्यांच्या परदेश दौऱ्यांमुळे आणि कथित पाकिस्तानी संपर्कांमुळे त्यांच्यावर संशय आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, पोलिस यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.





