Legislative Council Election: विधानपरिषदेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार कोण? सुप्रिया सुळेंनी थेट नाव सांगितलं
Legislative Council Election : विद्यमान विधानसभेतील संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्षाचे पारडे जड दिसत असून त्यांच्या वाट्याला ६ जागा येण्याची दाट शक्यता आहे.

Legislative Council Election: महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने मोठी उलथापालथ सुरू झाली असून १० जागांसाठी होणाऱ्या या रणधुमाळीने राजकीय वर्तुळात हालचालींना प्रचंड वेग दिला आहे. प्रमुख पक्षांमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये नावांची मोठी चाचपणी सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीचे निकाल राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारे ठरणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचे पारडे अत्यंत जड –
विद्यमान विधानसभेतील संख्याबळ पाहता भारतीय जनता पक्षाचे पारडे जड दिसत असून त्यांच्या वाट्याला ६ जागा येण्याची दाट शक्यता आहे. त्यापाठोपाठ शिवसेनेला २, तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी १ जागा मिळू शकते असा प्राथमिक अंदाज आहे. एका उमेदवाराला विजयासाठी साधारण २८ मतांच्या कोट्याची आवश्यकता असून महायुतीकडे असलेले स्पष्ट बहुमत पाहता त्यांचे किमान ८ उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. याउलट, संख्याबळाच्या मर्यादेमुळे महाविकास आघाडीला एकाच जागेवर समाधान मानावे लागण्याची चिन्हे आहेत. (Legislative Council Election)
संभाव्य उमेदवार – (Legislative Council Election)
या निवडणुकीत भाजपने सामाजिक आणि प्रादेशिक समतोल साधण्यावर भर दिला असून माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते आणि संजय काका पाटील यांच्यासह संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी यांची नावे चर्चेच्या अग्रस्थानी आहेत. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतही मोठी स्पर्धा असून नीलम गोऱ्हे, रविंद्र फाटक, संजय मोरे, किरण पावसकर, शीतल म्हात्रे, शायना एनसी, दिपक सावंत आणि बच्चू कडू यांसारख्या नावांची चर्चा रंगली आहे. (Legislative Council Election)
सुप्रिया सुळे यांची पोस्ट –
दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये एक महत्त्वाची घडामोडी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून एक मोठी मागणी केली आहे. राज्यातील ही विधान परिषद निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच लढावी अशी आग्रहाची विनंती त्यांनी केली आहे. उद्धवजी हे राज्यातील ज्येष्ठ व अनुभवी नेते असून त्यांच्या अनुभवाचा राज्याला आणि सभागृहाला सदैव फायदाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ठाकरेंनी या मागणीचा सकारात्मक विचार करावा अशी विनंती सुळे यांनी केल्याने आता ठाकरे गटाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरीही ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांची नावे देखील चर्चेत आहेत. Legislative Council Election
१२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान-
निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार येत्या १२ मे रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडेल आणि त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर केला जाईल. ९ जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशा एकूण १० जागांसाठी ही प्रक्रिया होत आहे. या निवडणुकीत आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असल्याने ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या महत्त्वाची आहे. या निवडणुकीत उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा कार्यकाळ संपत असल्याने, पक्ष जुन्या जाणत्यांना पुन्हा संधी देतात की नव्या चेहऱ्यांना प्राधान्य देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.





