नाशिकमध्ये ‘कमळ’ सोडून हाती ‘मशाल’! ‘या’ दोन नेत्यांचा निर्धार; भाजपला धक्का, उबाठाचं ‘बळ’ वाढणार…

Nashik politics : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. महायुतीमधील इन्कमिंग वाढत चाललेले आहे. विरोधी पक्षातील अनेक दिग्गज नेत्यांना गळाला लावले जात आहेत. अशातच ऐन दिवाळीच्या तोंडावर नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली आहे.
नाशिकमध्ये पहिल्यांदाच भाजपला दोन दिग्गज नेत्यांनी सोडचिठ्ठी दिली असून, लवकरच हे नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहे. यामुळे आता उद्धव ठाकरेंचे बळ वाढणार आहे. या नेत्यांसोबत त्यांचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने हाती मशाल घेणार आहेत. यामुळे नाशिकमध्ये ठाकरे गटाची ताकद वाढणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड सोमवारी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश कार्यक्रम होणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे. नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला मोठी गळती लागली होती. पहिल्यांदाच पक्षात इनकमिंग होत असल्याने याचा फायदा पक्षाला होणार आहे.
हेमंत गायकवाड आणि संगीता गायकवाड राजकीय वलय असलेल्या व्यक्ती आहेत. हेमंत गायकवाड हे पूर्वी शिवसेनेते होते. त्यानंतर काही काळ त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षात प्रवेश केला. तर त्यांच्या पत्नी संगीता गायकवाड मनसेतून नगरसेविका झाल्या. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला.
कमळ चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आणि त्या निवडून आल्या. आता हे दोघेही पती पत्नी पुन्हा शिवसेनेत (उबाठा) प्रवेश करत उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करणार आहेत. यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशास उबाठाला किती फायदा होणार याचे चित्र लवकरच स्पष्ट होईल.
हेही वाचा : IND vs AUS : पहिल्या सामन्यात फ्लॉप, तरी रोहित शर्माने गाठला ‘हा’ ऐतिहासिक टप्पा





