हा जरांगे चौथी नापास, मुख्यमंत्र्यांची आय-माय… बीडच्या सभेत हाकेंनी जरांगेंना ठणकावलं

बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी जीआर काढला आहे. मात्र या जीआर ओबीसी समाजाकडून जोरदार विरोध करण्यात आला. ओबीसी आरक्षणासाठी धक्का लागू नये यासाठी ओबीसी नेत्यांकडून राज्यभर महाएल्गार सभेचं आयोजन करण्याची घोषणा करण्यात आली होती.
यानंतर आज (शुक्रवार) बीडमध्ये ओबीसी समाजाच्या वतीने महाएल्गार मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मंत्री छगन भुजबळ, आमदार धनंजय मुंडे, आमदार गोपीचंद पडळकर, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यातील अनेक ओबीसी नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी, लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटील यांच्यासह सरकारवर जोरदार टीका केली.
“मराठा-कुणबी एकच; हा सामाजिक मूर्खपणा”, हाकेंचा हल्लाबोल
लक्ष्मण हाके यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीनुसार ओबीसी आरक्षणात अतिक्रमण होत असल्याचा आरोप करत म्हटले, मी एक जीआर घेऊन आलो आहे, ज्यात ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न आहे. यात पहिल्यांदा राज्य मागासवर्ग आयोग बरखास्त करा, असे सांगितले आहे. मराठा आणि कुणबी समाज एकच आहे, असे म्हणणे म्हणजे सामाजिक मूर्खपणा आहे, असं हाके यांनी म्हंटल.
ते म्हणाले की, आरक्षण हे गरिबी हटाव कार्यक्रम नाही, तर ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणारे आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे आणि त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन हाके यांनी केले.
मनोज जरांगे चौथी नापास
हाके यांच्या भाषणातील सर्वात चर्चेत राहिलेला भाग म्हणजे मनोज जरांगेंवरचा वैयक्तिक हल्ला. हा जरांगे चौथी पास आहे. त्याने राज्याच्या पहिल्या नागरिकाला त्यांच्या आई-बहिणींवर शिव्या दिल्या, असे म्हणत हाके यांनी जरांगेंच्या शैक्षणिक पार्श्वभूमीवरून आणि वागण्यावरून टीका केली.
ते म्हणाले, प्रत्येक वेळी आम्हाला न्यायालयात जाऊन दाद मागावी लागत असेल, तर तुम्हाला आम्ही मतदान का केले? प्रकाश सोळंके, बजरंग बाप्पा, तुम्ही ओबीसी आरक्षण पाहिले असेल तर जन्माने ओबीसीमध्ये यावे लागेल. आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नाही, असं हाके म्हणाले.



