Manoj Jarange – मी समाजासाठी लढतोय म्हणून मला रोज धमक्या देण्यात येत असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी दावा केला आहे. यामुळे वर्षभर आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून, समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचे काम हाती घेतले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मी मरणाला भीत नाही, पण माझे कुटुंबही यामध्ये डावावर लागले आहे, असे विधान मनोज जरांगे यांनी केले. ते करमाळ्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी बोलताना जरांगे म्हणाले, वर्षभर आपण संपूर्ण दौरे थांबवणार असून समाजासाठी एक नवीन यंत्रणा उभा करण्याचे काम हाती घेतले आहे. महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात समाज बांधवाला अडचण आल्यास पंधरा मिनिटात त्या ठिकाणी मदत उभी राहील, अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे. या वर्षभरात हेच काम पूर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. manoj jarange त्यामुळे आता मला कार्यक्रमाला बोलवणे बंद करा. मला माझे काम करू द्या, असे आवाहनही जरांगे यांनी केले आहे. दरम्यान, माझे संपूर्ण कुटुंब डावावर लागले आहे, कधी कोणी येऊन मला मारेल याची कल्पनाही नाही. पण मी समाजासाठी उतरलो आहे. रोज अशा धमक्या पाचोळ्या सारख्या येतात, पण मी त्याला भीक घालत नसल्याचे जरांगे यांनी म्हटले आहे. जरांगे यांनी लाडकी बहिण योजनेवर टीका करत, कायम टिकेल असे काहीतरी मागा. लाडकी बहिणीला दिलेले पंधराशे रुपये पुरतात का? बाजारात जाईपर्यंत उडून जातात, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच, लाथ मारेन तिथून पाणी काढून दाखवेन त्यामुळे, शेतकऱ्यांनी आता माझ्यासोबत हाक दिली की एकत्र यावे. मग बघतो कशी कर्जमाफी मिळत नाही. कसे हमीभाव मिळत नाहीत. कशी पिक विमा रक्कम मिळत नाही आणि कसे दुधाला भाव मिळत नाहीत. फक्त तुम्ही एकत्र या, मी तुम्हाला मिळवून देईल, असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.