पुणे | पुण्यात लाॅरेन्स बिष्णोई टोळी सक्रीय?

पुणे , {प्रभात वृत्तसेवा} – ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी हत्याप्रकरणात पुण्यातून लाॅरेन्स बिष्णोई टोळीतील सराईत शुभम लोणकर याचा भाऊ प्रवीणला रविवारी अटक करण्यात आली. पुण्यात लाॅरेन्स बिष्णोई टोळी सक्रीय असून, टोळीतील सराईतांची यादी तयार करण्याचे काम गुन्हे शाखेकडून हाती घेण्यात आले आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी वारजेतून मंगळवारी हरिशकुमार बालकराम (२७) या भंगार व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे. कट रचताना तो उपस्थित असल्याची प्राथमिक माहिती आहे.
सिद्दीकी यांच्या हत्येपूर्वी शुभमने धमकी देणारा संदेश प्रसारित सोशल मीडियात पोस्ट केला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या पथकाने लोणकरचा शोध सुरू केला. वारजे भागातून गुन्हे शाखेच्या पथकाने लोणकरचा भाऊ प्रवीणला अटक केली.
त्याला ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. सिद्दीकी हत्या प्रकरणात प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम सामील असल्याचे तपासात उघडकीस आले.
लोणकर मूळचा अकोला जिल्ह्यातील अकोट गावचा रहिवासी आहे. पुण्यात बिष्णोई टोळी सक्रीय असल्याचा संशय असून, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने टोळीतील सराईतांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे.
त्यांची यादी तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती गुन्हे शाखेतील अधिकाऱ्यांनी दिली.
एनसीसी छात्र ते बिष्णोई टोळीचा सदस्य
शुभम लोणकर विद्यार्थी दशेत राष्ट्रीय छात्र सेनेत (एनसीसी) होता. सुुरुवातीला त्याने पुण्यात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय केला. बिष्णोई टोळीच्या चित्रफिती पाहून तो आकर्षित झाला होता. कुटुंबीयांना त्याला मोबाइल वापरास बंदी केली होती.
जुलैपासून तो घरातून बेपत्ता झाला. माझी काळजी करू नका, असे त्याने आई-वडिलांना सांगितले होते. त्यानंतर तो राजस्थानात गेला होता. तेथे बिष्णोई टोळीतील सराईतांच्या संपर्कात आला.
२०२२ मध्ये शुभम आणि त्याचा भाऊ प्रवीणवर अकोला पोलिसांनी बेकायदा पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
त्यांच्याकडून पाच पिस्तूल जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर शुभमचा भाऊ प्रवीणने वारजे भागात लोणकर डेअरी सुरू केली होती. शुभमचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.




