lawrence bishnoi : ‘लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करा, एक कोटी मिळवा..’; करणी सेनेनं नेमकं असं का म्हंटलं? जाणून घ्या संपूर्ण घटना !

karni sena on lawrence bishnoi : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोई पुन्हा एकदा चर्चेत आला. सलमान खान सोबतच्या मैत्रीमुळे बाबा सिद्दिकी यांची हत्या करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान या सर्व घडामोडीत आता इतरांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या लॉरेन्स बिश्नोईलाच आता जीवे मारण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. क्षत्रिय करणी सेनेने लॉरेन्स बिश्नोईची हत्या करणाऱ्याला 1 कोटींचे बक्षीस जाहीर केले आहे.
लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या पोलिसांनाच ही ऑफर करण्यात आली आहे. जो पोलीस अधिकारी बिश्नोईचा एन्काऊंटर करेल त्याला करणी सेनेकडून एक कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
क्षत्रिय करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज शेखावत यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करून घोषणा केली आहे. मात्र, करणी सेनेकडून लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करण्यासाठी ही रक्कम का? देण्यात आहे याबद्दल आपण जाणून घेऊयात.
5 डिसेंबर 2023 रोजी करणी सेनेचे प्रमुख सुखदेव सिंह गोगामेडी यांची जयपूर येथील त्यांच्या घरी काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर गोळीबार करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला.
गोगामेडीच्या हत्येनंतर काही तासांनी लॉरेन्स बिश्नोई टोळीने त्याची जबाबदारी घेतली. या हत्येप्रकरणी यावर्षी 5 जून रोजी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर करण्यात आले होते, ज्यामध्ये रोहित गोदाराचा मुख्य सूत्रधार म्हणून वर्णन करण्यात आले होते.
याशिवाय गोल्डी ब्रार आणि वीरेंद्र चरण आणि इतरांवर हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. हे सर्व बिष्णोई टोळीशी संबंधित आहेत. याच घटनेचा राग डोक्यात ठेवून करणी सेनेनं लॉरेन्स बिश्नोईचा एन्काऊंटर करणाऱ्या अधिकाऱ्याला हे बक्षीस जाहीर केलं आहे.
लॉरेन्स बिश्नोई गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद
लॉरेन्स बिश्नोई सध्या गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद आहेत आणि तुरुंगातून कोणतीही भीती न बाळगता लॉरेन्स बिश्नोई सुमारे 700 लोकांसह आपली टोळी चालवत आहेत.
1998 मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अभिनेता सलमान खानचा समावेश असलेल्या काळवीट शिकार प्रकरणात तुरुंगात असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई (31) उर्फ बलकरण ब्रार अवघ्या पाच वर्षांचा होता. या प्रकरणामुळे बिष्णोई समाज प्रचंड संतापला होता.
सव्वीस वर्षांनंतरही तुरुंगात असूनही, कुख्यात गुंडाचा सलमानबद्दलचा तीव्र राग चर्चेत आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गेल्या आठवड्यात मुंबईत तीन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर बिष्णोई टोळीचे नाव समोर आले आहे.
मुंबई पोलिसांना संशय आहे की बाबा सिद्दिकीची हत्या बिश्नोईच्या सांगण्यावरून करण्यात आली होती, कारण फेसबुकवर एक पोस्ट आली होती, ज्यामध्ये असा दावा करण्यात आला होता की जो कोणी ‘सलमान खान आणि दाऊद टोळीला मदत करतो’ त्याने आपले खाते सेटल करावे.





