शिरूर – शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील शिरूर शहरासह ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली असून गांजा, अवैध दारु विक्री, गुटखा,जुगार, मटका, व्येश्या व्यवसाय या अवैध धंदयांनी उच्छाद मांडला आहे. ग्रामीण भागात विद्युत रोहित्र चोरीचे प्रमाण सुरूच आहे. शहरातून फोर व्हीलर , टु व्हिलर गाड्या चोरीचे सत्र, महिलांच्या गळयातील सोने पळवणे या घटना वारंवार सुरू असून महिनाभरातच स्विफ्ट, इरटिका,क्रेटा या फोर व्हीलर गाड्या चोरीला गेल्या आहे .यात एका पोलिसाची ईरटीका गाडी चोरीला गेल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. टाकळी हाजी आऊट पोस्टच्या हद्दीतील जांबुत ,पंचतळे परिसरात दिवसाढवळ्या एसटी अडवून वाहक व चालकाला मारहाण करण्यात आली. या परिसरात गुंडगिरी मोठ्या प्रमाणात वाढलेली असून या गुंडगिरी चा बिमोड करण्यासाठी पोलिसांनी ॲक्शन मोडवर येणे गरजेचे आहे. टाकळी हाजी येथे नवीन पोलीस ठाणे होणे गरजेचे असून यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. शिरूर शहरात विद्याधाम परिसर, स्टँड परिसर, सिटीबोरा कॉलेज रोडवर वाहतुकीची कोंडी नित्याचीच होत असून नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक कर्मचारी वरिष्ठांवर नाराज असल्याची चर्चा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना जाणुनबुजून मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांना वारंवार बंदोबस्ताकामी बाहेर पाठवण्यात येत आहे. त्यामुळे चांगले काम करणारे कर्मचारी गुन्हयाकडे दुर्लक्ष करत असल्याची चर्चा होत आहे.याकडे पोलीस उपविभागीय अधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. शिरूर शहर व परिसरातून अल्पवयीन मुली,महिला मिसिंग होण्याचे प्रमाणही फार वाढलेले आहे. एकूणच शिरूर पोलिसांच्या वसुलीमुळे अवैध धंदे जोमाने बोकाळले असून, गुन्हेगारीवर पोलिसांचा धाक उरलेला नसून शिरूरला एका दबंग अधिकाऱ्याची गरज निर्माण झाल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे.