पुणे जिल्हा | लवथळेश्वर शिवालयाला येणार नवी झळाळी

जेजुरी, {शिवराज झगडे} – सह्याद्रीच्या डोंगर रांगेत वसलेल्या ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा जपणार्या पुरंदरच्या भूमीला मोठा वारसा असल्याने भक्ती -शक्तीचे प्रतीक म्हटले जाते.
या भूमीतून उगम पावलेल्या क-हा नदीच्या काठाला शिवपूर्वकालीन -शिवकालीनव पेशवेकालीन 52 सरदारांचा इतिहास आहे तसे या इतिहासाची साक्ष देणारे पुरातन काळातील अनेक शिवमंदिरे आजही अस्तित्वात आहेत. मात्र शासनाकडून या मंदिराचे जतन-संवर्धन होणे गरजेचे आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीतील अशीच दोन पुरातन शिवमंदिरे असून शहरामध्ये प्रवेश करताना राष्ट्रीय महामार्गालगत दक्षिण दिशेला रस्त्यापासून किमान 12 फूट खोल भूगर्भात दगडी बांधणीचे लवथळेश्वर हे शिवालय आहे.
लवऋषींनी स्थापन केलेल्या या मंदिराचे अनेक पौराणिक ग्रंथातून उल्लेख असल्याने हे मंदिर प्राचीन असावे.
समर्थ रामदास स्वामींचे काही काळ येथे वास्तव्य असताना त्यांनी लवथळती विक्राळी ब्रह्मांडी माळा..विषकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ही शिवशंकराची आरती येथेच लिहिली.
तसेच खंडोबा गडकोटाच्या उत्तर दिशेला महाद्वारालगत मारुतीरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केल्याचे उल्लेख येथे आढळून येतात लवथळेश्वर मंदिरात प्रवेश करताना एका दगडावर सात ओळींचा शिलालेख आढळून येतो (शके 1530) सन.1608 साली आदिलशाही सरदार राघो मंबाजी खटावकर यांनी येथे मंडप व ओवरीचे काम केल्याचे उल्लेख आहेत
तर मंदिराच्या पश्चिम बाजूला असलेली विहीरीचे काम 16व्या शतकात बाबाजी धर्माजी काटे यांच्यातर्फे हेगोजी काटे यांनी केल्याचे उल्लेख आहेत.
प्राचीन धार्मिक स्थळे- मंदिरांचे अभ्यासक व पुणे विध्यापिठाचे तत्कालीन मराठी विभाग प्रमुख प्रा. ग.ह.खरे यांनी महाराष्ट्रातील पाच प्रमुख तीर्थस्थळांना 1935 ते 1952 या कालावधीत वेळोवेळी भेटी देत अभ्यासपूर्ण माहिती उजेडात आणली आहे.
भारत इतिहास संशोधक मंडळातील पेशवेकालीन दप्तरामधील मोडीलिखित कागदपत्रांमध्ये या मंदिराचे तसेच काही जमीन इनाम दिल्याचे उल्लेख आढळून येतात.
सध्या आजूबाजूला सिमेंटचे जंगल उभे राहिल्याने प्राचीन शिवालय लपल्याचे निदर्शनाला येत असले तरी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत निधीतून पुरातत्व विभागामार्फत साईप्रेम कन्ट्रक्शन लातूर या कंपनीच्या वतीनेसुमारे 12कोटी खर्चाचे लवथळेश्वर मंदिर, होळकर तलाव, मल्हार गौतमेश्वर मंदिर या तीन वास्तूंची डागडुजी दुरुस्ती जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू आहे.
200 वर्षांनंतर जीर्णोद्धार
जेजुरी नगरीच्या जडणघडणीत आदिलशाही सरदार राघो मंबाजी खटावकर , राजमाता जिजाऊ ,सातारचे छत्रपती शाहू महाराज, स्वराज्याचे पंत प्रतिनिधी पेशवे घराणे, महाराजा होळकर, पंतसचिव, सरदार चौगुले, घाटगे, पुरंदरे, पानसे, गोविंदपंत कुलकर्णी, गोंदेकर आदी घराण्यांनी येथे विकासकामे करत नगरीच्या वैभवात भर टाकली.
18व्या शतकानंतर मात्र येथे कामे झाल्याचे उल्लेख नाहीत. तर 2017ते 2022 सालात कार्यरत झालेल्या देवसंस्थान विश्वस्त मंडळाने तत्कालीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांमुळे जीर्णोद्धाराच्या कामाला निधी प्राप्त झाला.
त्यामुळे सुमारे200 वर्षानंतर येथील ऐतिहासिक /धार्मिक धार्मिक स्थळे, मंदिरे,आणि तिर्थकुंडांचा जीर्णोद्धार होणार आहे





