Mahakumbh 2025 : आजपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्याला सुरुवात झाली आहे. जगभरातून जवळपास 40 कोटी भाविक कुंभमेळ्याला हजेरी लावतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. परदेशातूनही लाखो नागरिक या ठिकाणी येणार आहेत. अॅपल कंपनीचे सह-संस्थापक स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन पॉवेल जॉब्स महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाल्या आहेत.
कुंभमेळ्यात सहभागी होण्याआधी त्यांनी वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. मात्र, यावेळी त्यांना शिवलिंगला स्पर्श करू दिलं नाही. यामागचे कारण देखील निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज यांनी सांगितले.
लॉरेन पॉवेल जॉब्स या पारंपारिक पोशाखात काशी विश्वनाथ मंदिरात उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्यासोबत निरंजनी आखाड्याचे आचार्य महामंडलेश्वर कैलाशानंद गिरी महाराज आणि संत महर्षि व्यासानंद गिरी हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा देखील केली.
कैलाशानंद गिरी महाराज यांनी लॉरेन यांना ‘कमला’ हे नाव दिले. तसेच, त्यांचे ‘अच्युत-गोत्र’ देखील दिले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मी त्यांना माझ्या मुलीप्रमाणे मानतो. लॉरेन्स जॉब्स अतिशय धार्मिक आणि आध्यात्मिक आहेत. त्यांना आपल्या परंपरा जाणून घ्यायच्या आहेत. त्या एक वडील आणि मार्गदर्शक म्हणून माझा आदर करतात. प्रत्येकाने त्यांच्याकडून शिकायला हवे. जग भारतीय परंपरा स्वीकारत आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, भारतीय परंपरेनुसार काशी विश्वनाथमध्ये हिंदू व्यतिरिक्त अन्य कोणीही शिवलिंगाला स्पर्श करू शकत नाही. त्यामुळे त्यांनी बाहेरूनच शिवलिंगाचं दर्शन घेतलं. जर मी ही परंपरा पाळली नाही तर ती खंडित होईल.
दरम्यान, लॉरेन पॉवेल जॉब्स या 29 जानेवारीपर्यंत भारतात आहेत. या दिवसांमध्ये त्या महाकुंभातील अनेक विधींमध्ये सहभागी होणार आहेत. त्यांचे पती स्टीव्ह जॉब्स यांचाही सनातन धर्मावर विश्वास होता. ते भारतात असताना नीम करोली बाबाच्या कैंची धाम आश्रमातही गेले होते.