Pune gramin : तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथून नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेली युवकांच्या दुचाकीला टेम्पोची धडक बसून झालेल्या अपघातात समीर संभाजी ढमढेरे व सार्थक विजय ढमढेरे या दोघा युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तळेगाव ढमढेरे येथील दिपक ढमढेरे, समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे हे तिघे युवक दुचाकीहून ११ डिसेंबर रोजी नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेलेले होते, देवदर्शन हून पुन्हा घरी येत असताना शिंदवणे घाटात समोरून भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोची दुचाकीला समोरून धडक बसून अपघात होऊन समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे हे दोघे गंभीर तर दिपक ढमढेरे किरकोळ जखमी झाले. दरम्यान टेम्पो चालक टेम्पो सोडून पळून गेला, यावेळी नागरिकांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असताना उपचार सुरु असताना आज १६ डिसेंबर रोजी सकाळच्या सुमारास समीर ढमढेरे व सार्थक ढमढेरे यांचा मृत्यू झाला असून याबाबत दिपक ढमढेरे यांनी उरुळीकांचन पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी एम एच १२ एल टी ०७४६ या टेम्पोवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करत आहे.