‘घरी बायकोला किती वेळ बघत बसणार’ म्हणणारे L&T चे चेअरमन नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, आता कंपनीने दिले स्पष्टीकरण

S N Subrahmanyan Statement: कर्मचाऱ्यांनी आठवड्याला 90 तास काम करायला हवे. घरी बसून बायकोला किती वेळ बघत बसणार, अशाप्रकारचे वक्तव्य लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे सुब्रह्मण्यन यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर जोरदार टीका केली जात आहे. सोशल मीडिया यूजर्सकडून त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
अभिनेत्री दीपिका पादुकोण, बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टानेही त्यांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर गदारोळ पाहायला मिळाला. त्यानंतर आता कंपनीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘हे भारताचे दशक आहे. हा असा काळ आहे, ज्यामध्ये विकासाला चालना देण्यासाठी व विकसित राष्ट्र बनण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्षांचे वक्तव्य हीच महत्त्वाकांक्षा दर्शवते, असे कंपनीने म्हटले आहे.
काय म्हणाले होते एसएन सुब्रह्मण्यन?
एलअँडटी सारख्या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांना शनिवारीही काम करायला लागते. 5 दिवसाचा आठवडा का लागू केला जात नाही? असा प्रश्न एसएन सुब्रह्मण्यन यांना विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना ते म्हणाले होते की, मी तुम्हाला रविवारी काम करायला लावत नाही, याचा मला पश्चात्ताप आहे. मी तुम्हाला रविवारी काम करायला सांगितले असते, तर मला अधिक आनंद झाला असता. कारण मीसुद्धा रविवारी काम करतो.
घरी बसून काय करणार आहात? किती वेळ तुम्ही बायकोला बघत बसणार आणि बायको तुम्हाला बघत बसेल?, असे वक्तव्य करताना त्यांनी चीन आणि अमेरिकेचे देखील उदाहरण दिले.
एक चीनच्या व्यक्तीने मला सांगितले की, अमेरिकेचे लोक आठवड्याला 50 तास काम करतात. तर चीनचे नागरिक आठवड्याला 90 तास काम करतात. अशाप्रकारे आम्ही अमेरिकेला सहज मागे टाकू. जर आपल्याला पुढे जायचे असेल तर 90 तास काम करायला हवे, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे.
कंपनीने दिले स्पष्टीकरण
एसएन सुब्रह्मण्यन यांच्यावर चारही बाजूंनी टीका होऊ लागल्यावर आता कंपनीकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. कंपनीने म्हटले की, ‘राष्ट्रनिर्मिती हा आमचा मूळ गाभा आहे. मागील 8 दशकांपासून आम्ही भारताच्या पायाभूत सुविधा, व्यवसाय आणि तांत्रिक क्षमतांना आकार देण्याचे काम करत आहोत. हे भारताचे दशक आहे, असा आमचा विश्वास आहे. हा असा काळ आहे, ज्यामध्ये विकासाला चालना देण्यासाठी व विकसित राष्ट्र बनण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.‘
कंपनीने पुढे म्हटले की, ‘आमच्या अध्यक्षांचे वक्तव्य हीच महत्त्वाकांक्षा दर्शवते की, असाधारण गोष्टी साध्य करण्यासाठी असाधारण प्रयत्न करणे गरजेचे आहे. L&T मध्ये आम्ही अशी संस्कृती जोपासण्यासाठी वचनबद्ध आहोत, जेथे उत्कटता, उद्देश आणि कामगिरीला नेहमीच पुढे नेण्यासाठी प्रयत्न केला जातो.’





