Lara Dutta Post : ‘रामायण’मधील कैकेयीच्या भूमिकेबद्दल लारा दत्ता भावुक; वडिलांच्या आठवणीत लिहिली हृदयस्पर्शी पोस्ट
Lara Dutta Post : यासंदर्भात लारा दत्ताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कैकेयीच्या भूमिकेबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे.

Lara Dutta Post : बहुचर्चित ‘रामायण’ हा चित्रपट ५ नोव्हेंबपासून चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत असून चित्रपटातील कलाकारांच्या भूमिकांची चर्चा सुरू झाली आहे.
अभिनेत्री लारा दत्ता हिने या चित्रपटात कैकेयीची महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. प्रभू श्रीरामांना १४ वर्षांचा वनवास घडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कैकेयीच्या व्यक्तिरेखेला लाराने वेगळ्या दृष्टिकोनातून साकारण्याचा प्रयत्न केला आहे.
यासंदर्भात लारा दत्ताने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कैकेयीच्या भूमिकेबद्दल आपली भावना व्यक्त केली आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, आयुष्यातील हा महत्त्वाचा क्षण पाहण्यासाठी आज आपले वडील सोबत असते तर किती बरं झालं असतं, अशी भावनिक आठवणही तिने व्यक्त केली.
‘कैकेयी इतिहासातील सर्वाधिक गैरसमज झालेल्या महिलांपैकी एक’
इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लाराने कैकेयी ही इतिहासातील सर्वाधिक गैरसमज झालेल्या महिलांपैकी एक असल्याचे मत तिने व्यक्त केले.
लारा म्हणाली, “इतिहासातील कदाचित सर्वात गैरसमज झालेल्या स्त्रीची भूमिका साकारणे हे खरोखरच एक विलक्षण सौभाग्य आहे. तिच्या मानवी भावना, तिचे दुःख, तिची असुरक्षितता, तिचा अपराधबोध आणि तिचा पश्चात्ताप जिवंत करण्याची जबाबदारी मिळणे, हे माझ्यासाठी मोठे भाग्य आहे.”
View this post on Instagram
कैकेयीच्या भूमिकेकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचे आवाहन
कैकेयीच्या व्यक्तिरेखेबद्दल प्रेक्षकांनी पारंपरिक समजुतींच्या पलीकडे जाऊन विचार करावा, अशी अपेक्षाही लाराने व्यक्त केली आहे. ती पुढे म्हणाली, “मी मनापासून आभारी आहे. आज ही दैवी कथा तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मला आशा आहे की माझ्या छोट्याशा प्रयत्नाने मी माता कैकेयीच्या पात्राला न्याय देऊ शकेन. जुन्या रूढीवादी कल्पनांच्या पलीकडे जाऊन, एका दैवी भविष्यवाणीच्या पूर्ततेमध्ये तिने बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेसाठी तुम्ही तिचा स्वीकार कराल.”
या चित्रपटाचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल लाराने निर्माते नमित मल्होत्रा आणि दिग्दर्शक नितेश तिवारी यांचे आभार मानले आहेत. तसेच सहकलाकार आणि संपूर्ण चित्रपटाच्या टीमचेही तिने कौतुक केले आहे.
Jantar Mantar : ३३ वर्षांनंतर जंतर-मंतरवरील बॅरिकेडिंग हटवली ; आंदोलने बंद, वाहतूक पुन्हा सुरू




