Jantar Mantar : ३३ वर्षांनंतर जंतर-मंतरवरील बॅरिकेडिंग हटवली ; आंदोलने बंद, वाहतूक पुन्हा सुरू
Jantar Mantar : दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर परिसर आता सर्वसामान्य नागरिक आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

Jantar Mantar : दिल्लीतील ऐतिहासिक जंतर-मंतर परिसर आता सर्वसामान्य नागरिक आणि वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. गेल्या ३३ वर्षांपासून देशातील आंदोलने आणि निदर्शनांचे प्रमुख केंद्र राहिलेल्या या ठिकाणावरील कडक सुरक्षा व्यवस्था आणि बहुस्तरीय बॅरिकेडिंग दिल्ली पोलिसांनी हटवली आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुन्हा सुरळीत झाली असून वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
काय आहे जंतर-मंतरचा ३३ वर्षांचा इतिहास? Jantar Mantar :
जंतर-मंतर हे केवळ ऐतिहासिक स्थळ नसून देशातील विविध आंदोलनांचे महत्त्वाचे केंद्र राहिले आहे. सरकारविरोधात निषेध नोंदवायचा असो किंवा आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवायचा असो, देशभरातील शेतकरी, कामगार, सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी येथे अनेकदा आंदोलने केली आहेत. १९९३ मध्ये जंतर-मंतरला अधिकृत आंदोलन स्थळाचा दर्जा देण्यात आला होता. त्यानंतर तब्बल ३३ वर्षे हे ठिकाण आंदोलनांचे प्रमुख केंद्र राहिले.
आंदोलन स्थळाचा दर्जा का काढला?
दिल्ली पोलिसांनी गेल्या ऑक्टोबरमध्ये जंतर-मंतरला अधिकृत आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. कॉकरोच जनता पार्टीसह इतर संघटनांनी मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात येथे निदर्शने करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये संघर्ष निर्माण झाला. त्यानंतर ११ ऑक्टोबर रोजी गृह मंत्रालयाच्या समितीच्या शिफारशीनुसार जंतर-मंतरला आंदोलन स्थळांच्या यादीतून वगळण्यात आले.
यानंतर परिसरातील सुरक्षा व्यवस्था हटवण्याची प्रक्रिया सुरू झाली. पॅरामिलिटरी फोर्स, क्विक रिस्पॉन्स टीम आणि दंगल नियंत्रणासाठी तैनात असलेली वाहनेही तेथून हटवण्यात येत आहेत.
आता कुठे होणार आंदोलने? Jantar Mantar :
जंतर-मंतरऐवजी दिल्ली पोलिसांनी आंदोलनांसाठी तीन पर्यायी ठिकाणे निश्चित केली आहेत. यामध्ये मध्य दिल्लीतील रामलीला मैदान, उत्तर दिल्लीतील बुराडी मैदान आणि पूर्व दिल्लीतील सीबीडी मैदानाचा समावेश आहे. त्यामुळे यापुढे आंदोलन करू इच्छिणाऱ्या संघटनांना या निर्धारित ठिकाणी परवानगी घ्यावी लागणार आहे.
एकीकडे जंतर-मंतरवरील बॅरिकेडिंग हटल्याने वाहतुकीचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे, तर दुसरीकडे ३३ वर्षांपासून आंदोलनांचे केंद्र राहिलेल्या या ठिकाणाचे महत्त्वाचे पर्व संपल्याची चर्चा सुरू झाली आहे.






