विज्ञानविश्‍व: रोबोट्‌स वापरणार खुणांची भाषा

डॉ. मेघश्री दळवी

रोबोट्‌सचा वापर हळूहळू वाढतो आहे. अलीकडे प्रकाशझोतात असणारे बरेच रोबोट्‌स हे ह्यूमनॉइड म्हणजे दिसायला माणसासारखे असतात. दोन हात-पाय, मान आणि डोकं असे. विशेषत: माणसांच्या संपर्कात येणारे रोबोट्‌स असे बनवलेले असतात. त्यामुळे रोबोट्‌सबरोबर वागताना माणसं जास्त सहजतेने वागू शकतात. ह्या रोबोट्‌सना अनेकदा ऐकण्याची आणि बोलण्याची क्षमता दिलेली असते. त्यांचा शब्दसंग्रह मोजका असेल, आवाज कृत्रिम वाटत असेल, तरी बोलण्याच्या क्षमतेमुळे ते माणसांना अधिक जवळचे वाटतात असा अनुभव आहे. रुग्णालयांमध्ये रुग्णांशी संवाद साधताना, आजारी व्यक्‍तींची देखभाल करताना, ग्राहकांचे प्रश्‍न सोडवताना किंवा अतिथींचे स्वागत करताना हे बोलणे कामी येते यात संदेह नाही.

मात्र, ज्या वेळी मूक-बधिरांशी संवाद साधण्याची वेळ येते, त्यावेळी हे रोबोट्‌स मागे पडतात. यावर उपाय म्हणून स्पेनमधल्या चार्ल्स थ्री युनिव्हर्सिटीमध्ये रोबोट्‌सना खुणांची भाषा शिकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अर्थात वाटतं तितकं हे काम सोपं नाही. खुणांची भाषा म्हणजे साइन लॅंग्वेज योग्य प्रकारे वापरण्यासाठी दोन हातांच्या दहा बोटांचा अचूक वापर करावा लागतो. त्यासाठी ही बोटं अत्यंत लवचिक असावी लागतात. त्याच जोडीने रोबोट्‌सना समोरच्या व्यक्‍तीच्या हातांनी केलेल्या खुणा व्यवस्थित समजून घ्याव्या लागतात. त्यामुळे या युनिव्हर्सिटीमधल्या रोबोटिक्‍स लॅबच्या संशोधकांनी सुरुवात केली ती रोबोट्‌सच्या हातापासून.

आपल्या पंज्याच्या बोटांना तीन भाग असतात, आणि अंगठ्याला दोन. त्यांच्यामध्ये असलेल्या सांध्यांमुळे हे भाग लवू शकतात. खुणांच्या भाषेत या सगळ्या भागांचा वापर केला असतो. त्यामुळे तसेच भाग असलेला रोबोट पंजा त्यांनी विकसित केला. त्याच वेळी टिया या रोबोटला स्पॅनिश भाषेसाठी असलेल्या खुणा वाचायला शिकवलं. हातांच्या बोटांची विविध स्थिती पाहणे, न्यूरल नेटवर्क प्रणाली वापरून त्यावरून अर्थ लावून संबंधित शब्द ओळखणे, शब्द एकत्र घेऊन समजून त्यांचं एक अर्थपूर्ण वाक्‍य करणे आणि त्या वाक्‍यातून आपल्याला काय सांगितलं आहे हे जाणून घेणे अशा टप्प्याटप्प्यांनी टिया रोबोट शिकला.

आता पुढची पायरी होती ती समजलेल्या वाक्‍याला खुणांचीच भाषा वापरून प्रतिसाद देणे. त्यासाठी टियाने तो विशिष्ट पंजा वापरत अनेक चाचण्यांमध्ये भाग घेतला. प्रत्यक्ष मूक-बधिरांबरोबर काम करताना टिया रोबोट सुमारे ऐंशी टक्‍के अचूक उत्तर देऊ शकला. अर्थात त्याला अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, पण ही सुरुवात खूप आशादायक आहे.

चार्ल्स थ्री युनिव्हर्सिटीमधल्या संशोधकांच्या जिद्दीची कमाल, कारण लवचिक यांत्रिक भाग घडवण्यासाठी उच्च दर्जाचं तंत्रज्ञान, खुणा पाहून त्यांचं विश्‍लेषण करण्यासाठी कॉम्प्युटर व्हिजन, अर्थ लावण्यासाठी एआय म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि या सगळ्याची खुणांच्या भाषेशी घातलेली सांगड हे त्यांनी अत्यंत हुशारीने आणि कल्पकतेने वापरून घेतलं आहे. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे रोबोट्‌सना आता मूक-बधिरांशी संवाद साधणे शक्‍य होणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×