Pune : भाषेने महापुरुषांना स्फुरण दिले – डॉ. सदानंद मोरे
Pune : पुणे - भाषा आहे माणसाकडे असलेले महत्त्वाचे साधन आहे. शब्दांमध्ये सामर्थ्य असून महाराष्ट्रातील महापुरुषांना स्फुरण चढले ते मराठीतच म्हणून भाषेने इतिहास घडविला असे म्हणता येते असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.

Pune : भाषा आहे माणसाकडे असलेले महत्त्वाचे साधन आहे. शब्दांमध्ये सामर्थ्य असून महाराष्ट्रातील महापुरुषांना स्फुरण चढले ते मराठीतच म्हणून भाषेने इतिहास घडविला असे म्हणता येते असे मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने दिनांक ०३ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या अभिजात मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
याप्रसंगी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष तुषार कुलकर्णी, स.प. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश मोहरील, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. विद्या अवचट आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिजात मराठी संस्कृतीची प्रतीके म्हणून दगडी जाते आणि उखळ, तुळशी वृंदावन, मातीची भांडी, दागिने, प्राचीन ग्रंथ यांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना डॉ. मोरे म्हणाले की, भाषेतच आपली जडणघडण होत असते. शब्दांचा संबंध आपल्या स्वभावाशी असतो म्हणूनच भाषा आपली व्यक्तिमत्त्वही घडवत असते. परकीय आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर मराठीने आपले मराठीपण कधीही हरवू दिले नाही म्हणूनच अभिजात भाषा दिवस हा केवळ त्या दिवसाचा इव्हेंट न राहता आपल्या जबाबदारीचे भान वाढविणारा दिवस ठरावा असे डॉ. सदानंद मोरे म्हणाले.
याप्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ. मोहरील म्हणाले की, भाषा ही मनांना जोडणारी असावी. भाषेच्या मानवनिर्मित भिंती भेदून आपल्याला एकसंध समाजाच्या निर्मितीसाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या वाचनाचा पैस वाढवावा आणि भाषेचा समृद्ध इतिहास जाणून घ्यावा असा मंत्र यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. मौखिक परंपरेने अभिजात मराठीचे अस्तित्व अधिक ठळक केले असून या अभिजाततेचे आपण पाईक असल्याचे मत प्राचार्य डॉ. मोहरील यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. विद्या अवचट यांनी केले. आपल्या स्वागतपर प्रास्ताविकात बोलताना डॉ. अवचट म्हणाल्या की, विद्यार्थ्यांनी केवळ प्रतीकांमध्ये अडकून न राहता संस्कृतींचे विविध कंगोरे जाणून घेत आपली सामाजिक बांधिलकी जपणे महत्त्वाचे आहे. यावेळी ग्रंथ पूजनात ठेवलेल्या प्राचीन ग्रंथांचे वाचन करण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी करावा आणि आपल्या भाषेचा समृद्ध इतिहास जाणून घ्यावा असे डॉ. अवचट म्हणाल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी मराठी संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचानालन विद्यार्थ्यांनी केले तर आभार प्रा. सत्यजित खांडगे यांनी केले.





