सिमला, किन्नौरमध्ये भूस्खलन; तेलंगणात मुसळधार पाऊस

नवी दिल्ली – तेलंगणा, महाराष्ट्रासह देशातील 21 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. हिमाचलमध्ये भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्ग-5 बंद झाला आहे. एनएच-5 महामार्ग शिमल्यात दोन ठिकाणी आणि किन्नौरमध्ये एका ठिकाणी ब्लॉक करण्यात आला आहे.
गुरुवारीही तेलंगणात मुसळधार पावसाने हजेरी लावली, त्यामुळे अनेक सखल भागात पूर आला होता. तेथे गेल्या आठवडाभरात पावसामुळे आठ जणांचा मृत्यू झाला आहे. आज राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालये बंद राहणार आहेत. दुसरीकडे, महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, कोल्हापूर, नागपूरसह अनेक शहरांमध्ये गुरुवारी मुसळधार पावसाने रस्ते जलमय झाले आहे. दिल्लीतील यमुनेची पाण्याची पातळी अजूनही धोक्याच्या चिन्हापेक्षा 205.83 मीटर वर आहे. दिल्लीत पुढील 5 दिवस पावसाचा “यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मणिपूर, झारखंडमध्ये दुष्काळी परिस्थिती
मुसळधार पावसामुळे हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड ते महाराष्ट्र, तेलंगणा या भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर देशातील 32 टक्के जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार मणिपूर, झारखंड आणि बिहार या जिल्ह्यांमध्ये 1 जून ते 27 जुलै दरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. 20 ते 27 जुलै दरम्यान बिहारमधील 20 जिल्हे आणि झारखंडच्या 24 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या निम्मा पाऊस झाला. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या बहुतांश जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.





