“१८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी”; अंबादास दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप

Ambadas Danve | उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावर एका जमिनीच्या खरेदी व्यवहाराप्रकरणी ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केले आहेत. पार्थ पवार यांच्या अमेडिया होल्डिंग्स एलएलपी कंपनीने १८०० कोटी रुपये बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० कोटी रुपयांत विकत घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यावरून अंबादास दानवे यांनी, फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या हा अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे, अशी टीका केली आहे.
अंबादास दानवे यांनी ट्वीट करत म्हंटले की, “मेवाभाऊंच्या राज्यात…१८०० कोटींची जमीन ३०० कोटींत खरेदी, स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये! उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली. हा झोल आता अजित पवारांनी किंवा पार्थ पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. गंमत तर पुढे आहे.”
एवढ्यावर हा प्रवास थांबला नाही तर या कंपनीने रियल इस्टेटचे भाव गगनाला असलेल्या कोरेगाव पार्क (पुणे) येथे चक्क आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली. एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, (ते ही महार वतानाची जमीन असताना) हे आता पार्थ पवारांनी समोर येऊन सांगावे, जेणेकरून इतर तरुणांनाही त्यांच्या या यशाचे गमक कळून येईल,” अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.
मेवाभाऊंच्या राज्यात…
१८०० कोटींची जमीन
३०० कोटींत खरेदी,
स्टॅम्प ड्युटी अवघे ५०० रुपये!उपमुख्यमंत्री महोदयांचे सुपुत्र पार्थ पवार यांची अमेडिया ही कंपनी जिचे भांडवल अवघे १ लाख रुपये आहे, या कंपनीला सुमारे १८०० कोटी बाजारमूल्य असलेल्या जमिनीची ३०० कोटींना खरेदी करता आली.…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 5, 2025
दोन दिवसात स्टॅम्प ड्युटीही माफ
“दुसरी बाब, सरकारी यंत्रणाही काय तत्पर झाली पहा कमाल झाली! २२ एप्रिल २०२५ रोजी अमेडिया कंपनीने आयटी पार्क उभारण्याचा ठराव केला. आश्चर्य म्हणजे अवघ्या ४८ तासात उद्योग संचालनालयाने या प्रकल्पावरील स्टॅम्प ड्युटीही माफ करून टाकली. उद्योग संचालनालयाने कोणत्याही अनुभवाशिवाय असा प्रस्ताव देणाऱ्या कंपनीचे प्रपोजल स्वीकारून कोणत्या नियमात स्टॅम्प ड्युटी माफ केली? यावर कळस म्हणजे २७ दिवसात हा सर्व व्यवहार जिकडे-तिकडे झाला आणि या ४० एकर जमिनीच्या व्यवहारासाठी लागलेली स्टॅम्प ड्युटी आहे फक्त रुपये ५००! फुले शाहू आंबेडकर यांचे नाव घ्यायचे आणि महार वतनाच्या जमिनी खिशात घालायच्या.. हा आहे अजित दादांचा पुरोगामी महाराष्ट्र!,” असंही अंबादास दानवे म्हणाले.
याशिवाय अजित पवार यांनी शेतकरी कर्जमाफीवरुन सारखच फुकट का लागतं? असं विधान केलं होतं. त्यावर देखील दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “एखादा शेतकरी लाख-दोन लाखांचे कर्जमाफीचे मागतो ते तुम्हाला फुकट लागतं म्हणता आणि तुम्ही काय करता. या महाराष्ट्राला लुटून नेण्याचे काम तुम्ही करताय. या विषयी आवाज आम्ही निश्चित उठवू,” अशी प्रतिक्रिया शिवसेना ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी दिली आहे. यामुळे आता या जमिनीच्या व्यवहारावरुन राज्यातील राजकीय वातावरणा चांगलेच तापण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:





