तीन वर्षात जमिनीचे व्यवहार वाढले; विकसकांनी खरेदी केली 90 हजार कोटी रुपयांची जमीन

नवी दिल्ली – करोनानंतर भारतामध्ये रिअल इस्टेट क्षेत्र वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत विकसक जमीन अधिग्रहीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. 2022 ते 24 या कालावधीत भारतात विकसकांनी 90 हजार कोटी रुपये मोजून 6 हजार एकर जमीन खरेदी केली आहे. ही माहिती जेएलएल इंडिया या संस्थेने जारी केली आहे.
विकासकांनी 2022 मध्ये 1,603 एकर जमीन खरेदी केली. यासाठी 18,112 कोटी रुपये मोजले. 2023 मध्ये 32,203 कोटी रुपये मोजून 1,947 एकर जमीन खरेदी केली. 2024 मध्ये विकसकांनी 2,335 एकर जमीन 39,742 कोटी रुपयांना विकत घेतली. त्यामध्ये केवळ विकसकांनी केलेल्या थेट व्यवहाराचा समावेश आहे. विकसकांनी जमीन मालकाबरोबर केलेल्या संयुक्त विकास प्रकल्पाचा या आकडेवारीत समावेश नाही.
2024 मध्ये जमीन खरेदीच्या व्यवहारात विकसन जास्तच आक्रमक झाल्याचे दिसून येते. विकसकांनी या वर्षात 23 शहरांमध्ये 134 व्यवहार करून 2,335 एकर जमीन खरेदी केली. या अहवालात असे नमूद करण्यात आले आहे की, खरेदी केलेल्या 81 टक्के जमिनीवर निवासी घरासाठी बांधकाम होणार आहे.
मोठ्या शहरात जास्त व्यवहार
मोठ्या शहरात जमिनीचे जास्त व्यवहार झाले. या शहरांमध्ये बंगळुरू, पुणे, चेन्नई, दिल्ली, एनसीआर, हैदराबाद, कोलकत्ता, मुंबई, पुणे यांचा समावेश आहे. एकूण झालेल्या व्यवहारातील 72 टक्के व्यवहार या मोठ्या शहरात झाले आहेत. तर छोट्या शहरात एकूण व्यवहारापैकी 28 टक्के व्यवहार झाले असून जमिनीचे क्षेत्रफळ 662 एकर आहे. आता छोट्या शहरातील व्यवहार वाढण्याची शक्यता आहे. नागपूर, वाराणसी, इंदूर, वृंदावन, लुधियाना या शहरांमध्ये जमिनीचे जास्त व्यवहार झाले.





