पिस्तुलाचा धाक दाखवत ठार करण्याचा प्रयत्न; शिरूरमध्ये जमीन व्यवहारातून चिघळले प्रकरण, आरोपीविरोधात गुन्हा दाखल

शिरूर: शिरूर तालुक्यातील करडे गावात एका जमीन व्यवहारातून उद्भवलेल्या वादातून एका व्यक्तीवर पिस्तुल रोखून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दिपक संपत नवले (रा. करडे, ता. शिरूर) या इसमाविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महेश दत्तात्रय रोडे (वय ४१, रा. करडे, व्यवसाय शेती व प्लॉटिंग) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक १२ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ते त्यांच्या राहत्या घरासमोर उभे असताना आरोपी दिपक नवले याने ५०,००० रुपयांच्या व्यवहारावरून वाद घालत थेट पिस्तुल घेऊन त्यांच्या दिशेने धाव घेतली.
थांब, तुला गोळ्या घालतो, मारूनच टाकतो. तू पैशासाठी खूप दिवस थांबवलंस!” असे धमकीचे शब्द उच्चारून त्याने हातातील पिस्तुल त्यांच्या छातीवर धरले व ट्रिगर ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुदैवाने महेश रोडे यांनी प्रसंगावधान राखून त्याचा हात बाजूला ढकलला व मोठा अनर्थ टळला.
गावात पोलिसांकडून सुरक्षेच्या उपाययोजना
या प्रकरणी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे. गेल्या काळात आरोपी दिपक नवले याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत परिसरात नवा तणाव निर्माण होऊ नये यासाठी सुरक्षेची उपाययोजना केली आहे.





