नवी दिल्ली – राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिना चढताना घसरून पडल्याने त्यांच्या खांद्याला आणि पायाला दुखापत झाली होती.
अगोदर त्यांना पाटणा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आता एअर ऍम्ब्युलन्सने त्यांना दिल्लीत आणण्यात आले आहे. दरम्यान, आज सकाळपासून त्यांच्या शरीराची काहीच हालचाल होत नसल्यामुळे त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले आहे.
माध्यमांना माहिती देताना लालूप्रसाद यांचे पुत्र तेजस्वी यादव म्हणाले की, एम्सच्या डॉक्टरांना त्यांची पूर्वमाहिती असल्यामुळे त्यांना येथे आणण्यात आले आहे. लालूप्रसाद यांना तीन ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहे. तसेच पाटणा येथील उपचारांत त्यांना औषधांची जादा मात्रा दिली गेली असावी त्यामुळे प्रकृती गंभीर झाल्याचे म्हटले जाते आहे.
डॉक्टरांनी सांगितले की, त्यांच्या शरीरात आज सकाळपासून कोणतीच हालचाल झालेली नाही. एकप्रकारे ते लॉक झाले आहे. तेजस्वी म्हणाले की, किडनी प्रत्यारोपणासाठी लालू यांना सिंगापूरला नेले जाणार होते. मात्र, या घटनेमुळे आता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढचा निर्णय घेतला जाणार आहे.