लक्षवेधी : वॉर्श यांची नियुक्ती आणि सोने
भारतातील महागाई वाढत असताना सोन्याचे भाव घसरत चालले आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेवर केविन वॉर्श (Kevin Warsh) यांची झालेली नियुक्ती.

– हेमंत देसाई
Kevin Warsh : भारतातील महागाई वाढत असताना सोन्याचे भाव घसरत चालले आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेवर केविन वॉर्श (Kevin Warsh) यांची झालेली नियुक्ती.
ज्यावेळी जगात युद्धाचे व अस्थिरतेचे ढग पसरू लागतात, तेव्हा शेअर बाजारात घसरगुंडी होत असते. उलट अशा उतरत्या काळात लोक सोने आणि चांदी खरेदी करू लागतात. कारण संकटाच्या वेळी सोन्या-चांदीचा आपल्याला अधिक उपयोग आहे, अशी जनभावना असते. त्यामुळे ग्रीनलँडचा विषय तापला असतानाच, सोने-चांदी तेजीत होती.
त्यापूर्वी अमेरिकेने इराणला धडा शिकवण्याची भाषा केली होती, तेव्हादेखील सराफ बाजारात तेजीचेच वातावरण होते. अमेरिका आणि युरोपीय युनियनमधील तणाव वाढल्यामुळे चांदीची भरधाव तेजी सुरू होती. चालू आर्थिक वर्षातील सर्वोत्तम कामगिरी करणारा मौल्यवान धातू म्हणून चांदीने स्थान मिळवले होते.
मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 मध्ये केवळ 4.02 टन सोने खरेदी केले होते. गेल्या आठ वर्षांचा विचार करता, ते फारच कमी आहे. 2024 मध्ये रिझर्व्ह बँकेने 72 टन सोने खरेदी केले होते. या गोष्टीचादेखील बाजारपेठेवर परिणाम होत असतो. रिझर्व्ह बँकेकडे एकूण 880 टन सोने आहे. नोव्हेंबर 2025 पर्यंत रिझर्व्ह बँकेच्या परकीय चलनसाठ्यातील सोन्याचे मूल्य 100 अब्ज डॉलर्सपेक्षाही जास्त होते. भारताच्या एकूण सुवर्णसाठ्यापैकी 52 टन सोने देशात सुरक्षित आहे. तर 348 टन सोने बँक ऑफ इंग्लंड आणि बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट यांच्याकडे सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर, इस्रायलमध्ये सत्तांतर झाले असून, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मध्यावधी निवडणुकीत मोठा हादरा बसला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्धाची धग कमी झाली आहे. भारतात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या एक महिन्यात सोने आणि चांदीच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.
गेल्या एका महिन्यात सोन्याचा दर 18 हजार 160 रुपयांनी कमी झाला होता, तर दुसरीकडे एक किलो चांदीचा दर 62 हजार 770 रुपयांनी घटला होता. हा मजकूर लिहीत असताना, 24 कॅरेट सोने दहा ग्रॅमला 1 लाख 26 हजार रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा 10 ग्रॅम भाव 1 लाख 14 हजार रुपये आहे. चांदीचा एक किलोचा भाव 1 लाख 50 हजार रुपये आहे.
24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते आणि 22 कॅरेट अंदाजे 91 टक्के शुद्ध असते. 24 कॅरेट सोन्याचे मात्र दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बाजारपेठेत 22 कॅरेटमध्ये जास्त प्रमाणात सोने विकले जाते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यासारख्या नऊ टक्के अन्य धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात.
गेल्या चार वर्षांत सोन्याच्या किमतीत प्रचंड वाढ सुरू होती. त्यामुळे आता त्यात घसरण झाली असली, तरीदेखील फेब्रुवारी 2022च्या तुलनेत या किमती 185% जास्त आणि फेब्रुवारी 2024च्या तुलनेत 98 टक्के अधिक आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याची निव्वळ वार्षिक मागणी 3200 टनांच्या आसपास असते. त्यामध्ये चार घटकांचा समावेश असतो.
दागदागिन्यांसाठी 27% आणि टेक्नॉलॉजी उद्योगांसाठी 8 टक्के अशी सोन्याची मागणी असते. त्याचप्रमाणे मध्यवर्ती बँकांकडून 21% मागणी असते. तसेच गुंतवणुकीकरिता 43% मागणी असते. गुंतवणूक मागणी म्हणजे इतर गुंतवणुकींसाठी सोने ‘हेज’ म्हणून वापरले जाते.
सरकारी रोखे किंवा समभाग विकत घेतल्यावर जसा रिटर्न मिळतो, तसा थेट सोन्यात गुंतवणूक करून मिळत नसतो. तरी माणसे सोने विकत घेतात. याचे कारण त्याचे मूल्य आज ना उद्या वाढेल, असा लोकांचा भरवसा असतो. चलनवाढीच्या दरापेक्षा सोन्याचे भाव नेहमीच जास्त प्रमाणात वाढले आहेत. महागाई जेवढी वाढते, त्या प्रमाणात सोन्यावरचा रिटर्न अधिक मिळण्याची शक्यता असते. यावेळी मात्र जगातील आणि भारतातील महागाई वाढत असताना सोन्याचे भाव घसरत चालले आहेत. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह या मध्यवर्ती बँकेवर केविन वॉर्श (Kevin Warsh) यांची झालेली नियुक्ती
ही नियुक्ती होण्यापूर्वी प्रत्येकाला वाटत होते की, चलनफुगवटा वाढतच जाणार आहे. यापूर्वी याबाबत फेडरल रिझर्व्ह काही करत नव्हते. परंतु वॉर्श हे मात्र चलनफुगवट्याला आळा घालतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. ट्रम्प यांनी जाहीरपणे विरोध केला असला, तरीदेखील वॉर्श यांची भूमिका ठाम आहे. वॉर्श यांनी गव्हर्नर म्हणून सूत्रे हाती घेताच, सप्टेंबरमध्ये व्याजदर वाढवले. तसेच यापुढेही व्याजदर वाढतील, असे त्यांनी सूचित केले आहे. या व्याजदर वाढीमुळे महागाई आटोक्यात येईल आणि मग सोन्याचे आकर्षण कमी होईल, असे सांगितले जात आहे. सोन्याची घसरण सुरू आहे, ती यामुळे.
बँक ऑफ जपानपासून ते युरोपियन सेंटर बँकेपर्यंत सगळ्यांनीच व्याजदर वाढवण्याचा निर्णय राबवला आहे. यापूर्वीच्या काळात बहुसंख्य देशाच्या सरकारने प्रचंड कर्जउभारणी केली. त्याच्या परिणामी महागाई वाढली. तसेच बहुतेक देशांमधील चलनफुगवट्याचे प्रमाण उद्दिष्टापेक्षा अधिक होते. त्याचवेळी युक्रेन, गाझापट्टी आणि मध्यपूर्व आशियाची रणभूमी धगधगत होती.
2008च्या जागतिक आर्थिक संकटानंतर (Kevin Warsh) जगातील मध्यवर्ती बँका सोन्याची खरेदी करत सुटल्या होत्या. आता सोन्याची घसरण झाल्यानंतर कदाचित या बँका पुन्हा खरेदीचा जोर लावू शकतील. म्हणजे एकीकडे व्याजदरात वृद्धी झाल्यामुळे सोन्याचे भाव नरम पडले असले, तरी बाजारपेठेतील अन्य घटक हा प्रवाह उलटवूदेखील शकतात. या दोन्ही घटकांवर भविष्यातील सोने आणि चांदीच्या भावांची स्थिती ठरेल.






