अग्रलेख : राजकीय भांगडा
पंजाबमधील विद्यमान राजकारणामध्ये (Punjab Election) आपली स्पेस पुन्हा एकदा नव्याने जर निर्माण करायची असेल, तर अशा प्रकारची मैत्रीची गरज आहे हे लक्षात आल्यानेच हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा मित्रत्वाच्या भावनेने एकत्र आले आहेत.

Punjab Election : उत्तर प्रदेशात लवकरच होणार्या विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Election) काँग्रेस आणि समाजवादी पार्टी यांच्यामधील जागावाटपाच्या समस्येवर अजून तोडगा निघत नसतानाच दुसरीकडे पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यामध्ये पुन्हा एकदा युती झाल्याने पंजाबमधील मतदारांना एक नवीन राजकीय भांगडा पाहायला मिळणार आहे.
अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील मैत्री काही नवी नसली, तरी गेल्या सहा वर्षांच्या कालावधीमध्ये या दोन्ही पक्षांमधील मैत्रीमध्ये दुरावा आला होता. पंजाबमधील विद्यमान राजकारणामध्ये (Punjab Election) आपली स्पेस पुन्हा एकदा नव्याने जर निर्माण करायची असेल, तर अशा प्रकारची मैत्रीची गरज आहे हे लक्षात आल्यानेच हे दोन्ही पक्ष पुन्हा एकदा मित्रत्वाच्या भावनेने एकत्र आले आहेत. भारतीय जनता पक्षाचे रणनीतिकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी युतीची घोषणा करत असतानाच अकाली दलाला मोठ्या भावाचा मानही देऊन टाकला आहे.
म्हणजेच विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रिपदाचा मान अकाली दलाला दिला जाईल असेच त्यांनी सूचित केले आहे. खरे तर अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यातील ही मैत्री खूप जुनी आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकर्यांच्या प्रश्नांवरून अकाली दलाने भारतीय जनता पक्षापासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आणि लोकसभा निवडणुकीमध्येसुद्धा पंजाबमध्ये हे दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढले. ज्याचा मोठा फटका या दोन्ही पक्षांना बसला.
विशेषतः पंजाब विधानसभा निवडणुकीमध्ये (Punjab Election) अकाली दल आणि भाजप या दोघांचीही अत्यंत वाईट स्थिती झाली. दिल्लीमध्ये प्रभावी ठरलेल्या आम आदमी पक्षाने पंजाबमध्येसुद्धा सत्ता मिळवली. तर लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसने 13 पैकी 7 जागा जिंकून आपला प्रभाव दाखवून दिला. विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांमध्ये अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांना यश मिळाले नसल्यानेच आता लवकरच होणार्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा मैत्री करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो.
अर्थात, अशा प्रकारे मैत्री जरी झाली असली तरी पंजाबमधील मतदार पुन्हा एकदा अकाली दलाच्या ताब्यात सत्ता देतील अशी कोणतीही परिस्थिती नाही, असे जमिनीवरील वास्तव सांगते. पंजाबमध्ये अजूनही आम आदमी पक्षाचा आणि काँग्रेसचा बर्यापैकी प्रभाव आहे. आम आदमी पक्षाच्या जागा जरी कमी झाल्या तरी त्या सत्ता गमावण्याइतक्या कमी होतील अशी शक्यता सध्यातरी दिसत नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंजाबमध्ये अमृतपाल यांचा एक पक्ष प्रभावीपणे समोर येताना दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये तुरुंगातून निवडणूक लढवून निवडून आलेले अमृतपाल यांनी गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये खलिस्तान या एका विषयावर आणि पंजाबमधील अंमलीपदार्थांचा प्रभाव संपवणे या दुसर्या विषयावर आपल्या पक्षाचा प्रभाव वाढवण्याचे काम केले आहे. पंजाबमधील तरुणाईला या नव्या पक्षाचे आकर्षण वाढताना दिसत आहे. तमिळनाडूमधील जनता ज्याप्रमाणे विजयच्या पाठीशी उभी राहिली अशा प्रकारचा एखादा चमत्कार पंजाबमध्येसुद्धा होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
एकीकडे सत्ताधारी आम आदमी पक्षाचा प्रभाव, दुसरीकडे काँग्रेसचा पूर्वीपासून असलेला पंजाबमधील प्रभाव, तिसरीकडे अमृतपाल सिंग यांच्या नव्या राजकीय पक्षाची वाढती लोकप्रियता या सर्व पार्श्वभूमीवर अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांना आपल्या युतीकडे पाहावे लागणार आहे. गेल्या निवडणुकीमध्ये अत्यंत नगण्य कामगिरी करणार्या या दोन पक्षांनी विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या कामगिरीत थोडी सुधारणा केली, तरी त्यांची युती यशस्वी झाली असे म्हणावे लागेल.
गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला एकही जागा मिळाली नव्हती. अकाली दल विधानसभेत तिसर्या क्रमांकावर फेकला गेला होता. साहजिकच भारतीय जनता पक्षासाठी गमावण्यासारखे काही नाही. अकाली दलाला मात्र आपली कामगिरी सुधारण्याची संधी या निमित्ताने मिळणार आहे. पंजाबमधील शेतकर्यांच्या प्रश्नासाठी सत्तेतून बाहेर पडलेल्या अकाली दलाच्या पाठीशी आजही अनेक शेतकरी समूह आहेत.
ग्रामीण भागांमध्ये अकाली दलाचे वर्चस्व आहे. तर शहरी भागांमध्ये, हिंदू बहुल प्रांतामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही प्रमाणात वर्चस्व आहे. त्याचा फायदा या दोन्ही पक्षांना होईल असे मानण्यात येत असले, तरी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी मतदार काय करतील याचा कोणताही अंदाज करता येत नाही. तरीही या युतीमुळे पंजाबमधील विधानसभा निवडणूक निश्चितच रंगतदार होणार आहे.गेल्यावेळी एकतर्फी पद्धतीने निवडणूक जिंकणार्या आम आदमी पक्षासाठी यावेळी नवनवीन आव्हाने तयार होताना दिसत आहेत.
एकीकडे आपल्या कामगिरीच्या जोरावर मतदारांना सामोरे जाण्याचा निर्णय आम आदमी पक्षाने घेतला असला, तरी दुसरीकडे काँग्रेसचे परंपरागत आव्हान आणि तिसरीकडे अकाली दल आणि भाजपची नवीन युती आणि चौथ्या बाजूला अमृतपाल सिंग यांच्या पक्षाचे नवे आव्हान अशा चौरंगी वातावरणामध्ये पंजाबमधील निवडणुकीचा हा ‘राजकीय भांगडा’ रंगताना (Punjab Election) दिसत आहे.






